हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीचा किल्ला असलेला जिल्हा म्हणजे रायगड! या किल्ल्याने, या जिल्ह्याने छत्रपतींचा राज्याभिषेक डोळे भरून पाहिला. या किल्ल्यावरूनच जिल्ह्याला रायगड हे नाव देण्यात आले आहे. या सोनेरी इतिहासाबरोबरच येथील भूगोल व पर्यटन ही क्षेत्रेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. रायगडला समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. शिवाय पूर्वेकडील सह्याद्रीची रांग, जिल्ह्यात राहणारे आदिवासी लोक ही वैशिष्ट्ये आहेतच. न्हावाशेवा येथील अत्याधुनिक बंदर (पंडित जवाहरलाल नेहरू बंदर) आणि पनवेलच्या आसपास झालेला औद्योगिक विकास हे घटक रायगडच्या प्रगतीला चालना देत आहेत. तसेच रायगड म्हटले की, खोपोलीचे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र व थळ-वायशेतचा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स चा कारखाना यांचीही दखल घ्यावीच लागते.

ऐतिहासिक महत्त्वाचे : बाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखत. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली. ब्रिटिश प्रतिनिधीने या मजबूत किल्ल्याला पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणून संबोधले होते. छत्रपती शिवरायांना अत्यंत प्रिय असलेला रायगड लक्षावधी मराठी जनांचे प्रेरणास्थान आहे. याच गडावर अवघ्या देशाला स्फूर्ती देणार्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. १८६९ च्या दरम्यान महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. १८९७ मध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांनी या ऐतिहासिक वास्तूला पुन्हा समाजासमोर आणले, जनजागृतीच्या दृष्टीने या स्थानाचे महत्त्व ठळक केले.