लोकजीवन


शेती
भात हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा क्रमांक दुसरा आहे. भाताच्या विविध जातींसंबंधी संशोधन करणारी केंद्रे कर्जत, खोपोली व पनवेल या तालुक्यात आहेत. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पोलादपूर, महाड, रोहे या तालुक्यांत नाचणी व वरई हीदेखील पिके बर्याच प्रमाणात पिकवली जातात. याचबरोबर अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड येथे माडाच्या मोठ्या बागा असून नारळ हे मुख्य फळ घेतले जाते. पोफळी व सुपारींची आगरेही श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड येथे अधिक प्रमाणत आढळतात. श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी प्रसिद्ध आहे. तसेच येथील डोंगरउतारावरील तांबड्या मातीत आंब्याची लागवड केली जाते. कमी-अधिक प्रमाणात रातांबा म्हणजेच कोकमाची झाडेही पाहायला मिळतात. या सर्व पिकांबरोबरच वाल, तूर, काजू, कलिंगड यांचेही उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. समृद्ध (मत्स्य उपलब्धतेचा विचार करता) सागरी किनारा, खाड्या, खाजणे यांच्या अस्तित्वामुळे येथे मत्स्यशेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रामुख्याने कोळंबीची शेती केली जाते.

उद्योग
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र या जिल्ह्यातील खोपोली हे आहे. त्याचबरोबर भिरा व भिवपुरी हीदेखील दोन महत्त्वाची जलविद्युत केंद्रे रायगड जिल्ह्यात आहेत. उरण येथे नैसर्गिक वायू साठवला जातो, तेथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव ज्याला देण्यात आले, ते न्हावाशेवा (जे.एन्.पी.टी.) आंतरराष्ट्रीय अत्याधुनिक बंदर हे रायगडच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे. नागोठणे येथे इंडियन पेट्रो केमिकल हा उद्योग क्षेत्रातील मोठा प्रकल्प आहे. थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स) निर्मिती केली जाते. तसेच कीटकनाशके बनवणारा आशियातील सर्वात मोठा हिंदुस्थान इन्सेक्टीसाइड्स हा कारखानाही पनवेल तालुक्यात रसायनी येथे आहे. याच तालुक्यात आयुर्वेदीक औषधांची निर्मिती करणारा धूत पापेश्वर हा मोठा कारखाना आहे. महाड येथे हातकागद तयार करण्याचा उद्योग आहे तर रोहे व खोपोली येथे पुठ्ठे तयार करण्याचा व्यवसाय चालतो.

दळणवळण
महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्ग पनवेल, खोपोली या तालुक्यांतून जातो. तसेच या जिल्ह्यातून मुंबई - पुणे - बंगलोर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) व मुंबई - गोवा - मंगलोर महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) असे दोन महामार्गही जातात.
१८५६ मध्ये वाहतूकीस खुला करण्यात आलेला मुंबई - पुणे लोहमार्ग व एक आदर्श प्रकल्प म्हणून गणली जाणारी कोकण रेल्वे हे दोन लोहमार्ग या जिल्ह्यातील महत्त्वाचे लोहमार्ग आहेत. याशिवाय पनवेल जवळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. सह्याद्रीच्या रांगा ओलांडून जिल्ह्यापलीकडे जाताना भीमाशंकर, बोर, लिंगा, कुंभा, कावळ्या, शेवत्या, वरंधा, ढवळा यांसारखे घाट पार करावे लागतात.

पेण येथे शाडूच्या मूर्ती तयार करण्याचा परंपरागत व्यवसाय असून तेथे तयार होणार्या गणपतीच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे पेण येथे पोहे पापड विक्री घरगुती महिला मोठ्या प्रमाणावर करतात. अधिक लांबीचा समुद्र किनारा, खाड्या, यांमुळे मासेमारी व प्रक्रिया उद्योग येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. पापलेट, हाईद, सुरमई, बांगडा इत्यादी जातींचे मासे येथे पकडले जातात.