राजाभाऊ राईलकरांची वाडी - कोकणमेवा असणा-या झाडांनी नटलेली वाडी

aali

राजाभाऊ राईलकरांनी पाऊण एकर जमिनीमध्ये ही शेकडो जातींची फुलझाडे, फळझाडे, वेली आणि वृक्ष लावून ही जिवंत वनस्पतींची वाडी तयार केली आहे. यामध्ये आंबा, नारळ, पोफळी, फणस, रातांबा अशी कोकणची झाडे तर आहेतच, पण त्या जोडीला असंख्य दुर्मिळ, औषधी आणि काही परदेशी वनस्पती आहेत. एकेक झाड पाहताना हा खजिना उलगडत जातो. कवठी चाफा, बकुळ, सीतेचा अशोक, सोनटक्का, अशी फुलझाडे त्यांचा सुगंध आणि सौंदर्य उधळत पुढे येतात. वनस्पतींच्या दालनात अनंतमूळ, चित्रक, तुळस, ब्राह्मी, महाळुंग, वैजयंती, शतावरीसारख्या वनस्पती औषधी वनस्पती आहेत. जायफळ, दालचिनी, मिरीचा वेल आणि ‘ऑल स्पायसेस’सारख्या मसाले पदार्थाच्या वनस्पती आणि अननस, कॉफी, चॉकलेटमध्ये वापरला जाणारा कोकोे, साबूदाणा यासारख्या वनस्पती या वाडीत आहेत. वनस्पतींच्या या दुनियेत आफ्रिकेतील ‘अ‍ॅव्हाकॅडो’ किंवा ‘बटरफ्रूट’, तसेच अमेरिकेतील ‘पॅशन फ्रूट’सारखी विदेशी झाडेही दडून बसलेली असतात. हा सारा संग्रह विलक्षण आणि त्यातही जिवंत आहे. राईलकरांनी तोे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवला आणि आता त्यांच्यामागे त्यांची मुले शैलेश आणि संतोष या ठेव्याचे वनस्पती संग्रहालय करण्याच्या खटपटीत आहेत.

Add new comment