जलयुक्त शिवार अभियान - दुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकतेत वाढ

production

जलयुक्त शिवार अभियान या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानामुळे रायगड जिल्ह्यात एकूणच दुबार पेरणी क्षेत्रात आणि पीक उत्पादकतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जलयुक्त शिवार अभियानात राबविण्यात आलेल्या जलसंधारण उपचारांच्या कामांमुळे हे परिणाम दृष्टीपथास आले आहेत. पीक उत्पादकता वाढ मोजण्यासाठी जिल्ह्यात जे पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले त्यातून हे परिणाम समोर आले आहेत. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 45 गावांमध्ये 970 जलसंधारण उपचाराची कामे हाती घेण्यात आली होती. त्यावर्षी या कामांवर 30 कोटी 90 लक्ष 68 हजार रुपये निधी खर्च झाला होता. तर सन 2016-17 मध्ये 38 गावांमध्ये 1146 कामे हाती घेण्यात आली होती. जलसंधारण उपचारांमुळे भुगर्भातील जलपातळी वाढतानाच जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे साहजिक पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन उत्पादकता वाढते. सन 2015-16 आणि 2016-17 या दोन वर्षातील कामांचा एकत्रित परिणाम पाहण्यासाठी जिल्ह्यात पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले. भाताच्या उत्पादकतेत वाढ हे प्रयोग मुरुड, महाड, पोलादपूर आणि म्हसळा तालुक्यात भात पिकासाठी राबविण्यात आले. या चारही तालुक्यात एकूण 18 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण उपचाराची कामे राबविण्यात आली होती. या चारही तालुक्यांची सरासरी भात पिकाची उत्पादकता ही 24.93 क्विंटल प्रति हेक्टर इतकी होती. जलयुक्त शिवार अभियानाच्या जलसंधारण उपचारानंतर भात पिकासाठी 33.14 क्विंटल प्रति हेक्टर इतकी झाली. म्हणजेच भात पिकाच्या उत्पादकतेत 8.21 क्विंटल प्रति हेक्टर प्रमाणे वाढ झाली. नाचणीची उत्पादकताही वाढली याच प्रमाणे पेण, खालापूर, सुधागड, महाद आणि श्रीवर्धन या तालुक्यांमधील गावांमध्ये नाचणी पिकासाठी पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले. या पाच तालुक्यातील 20 गावांचा जलयुक्त शिवार अभियानात समावेश होता. या पाचही तालुक्यांत मिळून सरासरी नाचणी उत्पादन हे 6.95 क्विंटल प्रति हेक्टर होते ते जलयुक्त शिवार अभियानानंतर 8.76 क्विंटल प्रति हेक्टर इतके झाल्याचे दिसून आले. म्हणजेच नाचणी पिकाच्या उत्पादकतेत 1.81 क्विंटल प्रति हेक्टर इतकी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रब्बीच्या क्षेत्रातही वाढ जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यात दुबार पेरणी क्षेत्रात म्हणजेच रब्बीच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सन 2014-15 मध्ये रब्बीचे क्षेत्र जिल्ह्यात 18.54 हेक्टर इतके होते. ते सन 2016-17 मध्ये 28.44 इतके झाले आहे. म्हणजेच रब्बी क्षेत्रात 9.90 हेक्टर इतक्या क्षेत्राने वाढ झाली आहे. सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानामुळे 251.67 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. एकूणच जिल्ह्यातील शेतकरी आता दुबार पीक पद्धतीकडे वळत आहेत. दुबार पीक पद्धतीत भाजीपाला लागवडीकडेही शेतकऱ्यांचा अधिक कल दिसून येत आहे. भाजीपाला हे पीक नगदी असल्याने शेतकरी भाजीपाल्याची लागवड अधिक करताना दिसत आहेत. जलयुक्त शिवारमुळे भूजल पातळी वाढल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकरी हे विहिरीच्या पाण्यावर भाजीपाला उत्पादन घेताना दिसत आहेत

Add new comment