वासुदेव बळवंत फडके (Vasudev Balwant Fadke)

vasudev balwant fadke

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यात १८४५ साली शिरढोण या गावी झाला. कल्याण येथे प्राथमिक शिक्षण संपवून ते इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. गिरगावातील फणसवाडी येथील जगन्नाथाचे चाळीत वास्तव्य करून त्यांनी काही काळ इंग्रजी अभ्यास केला व पुढील शिक्षणासाठी ते पुण्यास रवाना झाले. शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. प्रश्न मनात आला जर आपणास आपल्या आईला भेटता येत नसेल तर त्या नोकरीचे मोल काय? त्यात आईचे निधन झाले व शेवटी भेट घेता आली नाही. या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्याच वेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला. इंग्रज सरकारच्या हलगर्जी कारभाराचे मुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप त्यांचे मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. व तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. १८५७ च्या अयशस्वी क्रांती पर्वानंतर भारतीय स्वातंत्र्याचे ध्येय स्पष्टपणे समोर ठेऊन ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याचा जो सशस्त्र प्रयत्न झाला तो वासुदेव बळवंत फडके यांचे बंडच होय. त्यात त्यांना रामोशी, भिल्ल, आगरी, आणि कोळी तरुणांचा पाठिंबा मिळाला. या वीराच्या स्मरणार्थ स्मारक समिती स्थापन होऊन अनेक सामाजिक कामे केली जातात. अव्वल इंग्रज काळातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे एक थोर दत्तोपासक म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण गावी झाला. कर्नाळ्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्याकडे होती. लहानपणापासूनच वासुदेव हूड व बंडखोर वृत्तीचा होता. कल्याण, मुंबई, पुणे येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्या वेळच्या जी. आय. पी. रेल्वेकंपनी, ग्रॅंट मेडिकल कॉलेज इत्यादी ठिकाणी नोकरी करणाऱ्या वासुदेवाच्या मनात इंग्रजी राजवटीविषयी तिरस्कार उत्पन्न होत होता. सत्तावनच्या युद्धाची प्रेरणा त्याच्या मनात होतीच. पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्यवृत्ती उसळून वर आली. मंत्रतंत्र, सत्पुरुषांच्या गाठीभेटी यांत त्यांना गोडी वाटे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनाही ते भेटले होते. वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. श्रीपादवल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढवून घेतले होते. दत्ताचे हे रौद्र दर्शन त्यांच्या बंडखोर मनाला प्रेरणा देई. त्याची नित्य ते पूजा करीत. रोज ते श्रीगुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचीत. दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ ‘दत्त महात्म्य’ नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांना मानस होता. गंगाधरशास्त्री दातार यांच्याकडून ‘दत्तलहरी’ या स्तोत्राचे भाषांतर करवून वासुदेव बळवंतांनी प्रसिद्ध केले होते. राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली. एडन येथेच जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले. ‘दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांसाठी दिल्या. हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी त्यांची वृत्ती होती. वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

Add new comment