रायगड जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी

डॉ प्रभाकर गणपत गावंड
इतिहास विभाग प्रमुख
सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर रायगड

रायगड हा महाराष्ट्रातील विद्यमान 36 जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. महाराष्ट्राला निसर्गतः लाभलेल्या 720 कि.मी. च्या समुद्र किनारपट्टीवरील अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणून तो ओळखला जातो. रायगड जिल्ह्याची पूर्व सीमा ही सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगांनी व्यापली असून त्याच्या पलिकडे पुणे व आग्नेय दिशेला सातारा जिल्हा आहे. दक्षिण दिशेला रत्नागिरी जिल्हा असून पश्चिमेला अरबी समुद्र आहे. जिल्ह्याच्या वायव्येला मुंबई व उत्तरेला ठाणे हा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्याची दक्षिणोत्र लांबी सुमारे 150 कि. मी. असून पूर्व-पश्चिम रुंदी 50 कि. मी च्या दरम्यान आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7148 चै. कि. मी असून 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 2634200 (सव्वीस लाख चैतीस हजार दोनशे) आहे.

1981 पर्यंत रायगड जिल्हा हा ‘कुलाबा’ या नावाने ओळखला जात होता. कुलाबा या नावालाही ऐतिहासिक पर्श्वभूमी होती. कुलाबा हा शब्द भौगोलिक असून शब्द व्याप्ती शास्त्रानुसार त्याचा अर्थ जमिनीची समुद्रात गेलेली लांबच लांब अषी ‘दांडी अथवा ‘भूशीर’ होय. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग या शहराच्या नजिक कुलाबा हा किल्ला (जलदुर्ग) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीनंतर या किल्ल्याचे बांधकाम केले. कुल म्हणजे बाजू व आप म्हणजे पाणी. त्यामुळे कुल-आप मिळून कुलाबा म्हणजे ज्याच्या चारही बाजुला पाणी असलेला किल्ल्यासारखा टेकडीचा भाग म्हणून या जलदुर्गाला ‘कुलाबा’ हे नाव पडले असावे अशी येथील स्थानिकांमध्ये आख्यायिका आहे.

भारतावर ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित झाल्यानंतर प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांनी वेगवेगळे प्रांत निर्माण केले. या प्रांतांची विभागणी अनेक जिल्ह्यांमध्ये केली. ब्रिटिशांनी सन 1818 मध्ये मराठी सत्तेच्या शेवट केला. त्याही पूर्वी 1756 मध्ये रायगड जिल्ह्याचा काही भाग त्यांनी पेशव्यांकडून हस्तगत केला होता. मुंबई बेटावर ब्रिटिषांचे वर्चस्व असल्याने मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्ह्यात याच काळात त्यांचा शिरकाव झालेला होता.

पेशवाईच्या अस्तानंतर राजपुरी (मुरुड), साक्षी (पेण), व रायगड (महाड) हे तीन उपविभाग ब्रिटिश अंमलाखाली आले. यावेळी कुलाबा हे स्वतंत्र संस्थान होते. आंग्रे हे या संस्थानाचे संस्थानिक होते. पेणच्या उत्तरेकडील व पनवेलच्या दक्षिणेकडील काही खेडी 1839 पर्यंत आंग्रे यांच्या ताब्यात होती. 1839 मध्ये कान्होजी आंग्रे (दुसरे) हे  मरण पावल्यानंतर ब्रिटिशांनी कुलाबा हे संस्थान खालसा केले व ते ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग बनले.

कुलाबा संस्थानाच्या प्रदेशांवर ब्रिटिशांनी पोलिटिकल सुपरिटेंडेंटची नेमणूक करून त्याला 1844 च्या अधिनियम 17 अनुसार पोलिटिकल एजंटचा दर्जा दिला. तेव्हापासून या प्रदेवर सर्व प्रकारचे ब्रिटिश कायदे व नियंत्रण लागू करण्यात आले. 1844 च्या कायद्यानुसारच ऑक्टोबर 1844 मध्ये कुलाबा संस्थानातील उत्तरेकडील काही गावे तत्कालीन ठाणे जिल्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आली.

1848 ते 1856 या काळात लॉर्ड डलहौसी हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होता. त्याच्या कारकीर्दीत संस्थाने खालसा करण्याचे धोरण अधिक प्रभावीपणे राबविण्यात आले. कुलाबा संस्थानाचे ब्रिटिश साम्राज्यातील विलीनीकरण हे देखील त्याच्याच धोरणानुसार 1853 मध्ये अधिक परिणामकारक रित्या करण्यात आले. कुलाबा संस्थानाच्या बाहेरील राजपुरी (मुरुड), साक्षी (पेण), व रायगड (महाड) हे उपविभाग व काही लहान लहान महाल यांचा समावेश करून कुलाबा हा उपजिल्हा बनविण्यात आला. त्यानंतरच्या 15 ते 20 वर्षात ब्रिटिशांनी अनेक प्रशासकीय बदल केले आणि 1869 मध्ये कुलाबा हा स्वतंत्र जिल्हा निर्माण केला. यावेळी कुलाबा या नवीन जिल्ह्यात अलिबाग, रोहा, पेण, माणगाव व महाड हे तालुके समाविष्ट  होते. पुढे 1883 मध्ये ठाणे जिल्ह्यातील उरण व पनवेल हे तालुके तर 1891 मध्ये कर्जत हा तालुका रायगड जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये पंतप्रतिनिधींकडून भोर तर सिद्दीकडून जंजिरा हे संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आले. त्यामुळे कुलाबा जिल्ह्यामध्ये मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, सुधागड-पाली हे तालुके समाविश्ट झाले. विद्यमान रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड-पाली, रोहा, मुरुड, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड व पोलादपूर असे एकुण 15 तालुके समाविष्ट आहेत

इतिहास

रायगड या नावालाच फार मोठा इतिहास आहे. रायगड हे नाव उच्चारल्यावर रायगड जिल्हा व रायगड किल्ला या दोन प्रतिमा नजरेसमोर उभ्या राहतात. रायगड किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रायगड हा किल्ला तमाम मराठी माणसाचे स्फूर्तिस्थान बनले आहे. रायगड किल्ल्याचे हे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन 1 मे 1981 रोजी महाराष्टचे तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून ‘रायगड’ असे केले.

रायगड जिल्ह्याला इतिहासाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. या इतिहासाचे प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन टप्प्यात वर्गीकरण करण्यात येते.


प्राचीन कालखंड -

अरबी समुद्र आणि सहयाद्री पर्वताच्या डोंगररांगा यांच्या दरम्यान असलेली उत्तर दिशेला गुजरातमधील दमणपासून दक्षिण दिशेला गोव्यापर्यंतची अंदाजे 720 कि. मी. लांबीची व 45 ते 90 कि. मी. रुंदीची चिंचोळी पट्टी प्राचीन काळापासून कोकण या नावाने ओळखली जाते. या कोकण पट्टीचे दक्षिण कोकण व उत्तर कोकण असे दोन भाग पडतात. पैकी उत्तर कोकणमध्ये सध्याच्या रायगड व ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. म्हणजेच उत्तर कोकणचा प्राचीन इतिहास हाच रायगड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास होय.

अनेक पुरातन ग्रंथांमध्ये कोकण प्रांताविषयीचे उल्लेख सापडतात. कोकणचा अपरांत (पश्चिमेकडील टोक) या नावानेही उल्लेख सापडतो. कालिदासाच्या रघुवंश या नाटकामध्ये अपरांत या नावाचे वर्णन आहे. इ.स.पूर्व 4 थ्या शतकापासून असे उल्लेख नजरेस पडतात. हरिवंश, विश्णू पुराण, बृहत्संहिता, राजतरंगिणी यासारख्या ग्रंथांमध्ये अपरांताचे वर्णन असल्याचे आढळते. विविध शिलालेख तसेच प्लिनी, टॅलेमी, ह्यू-एन-त्संग, इब्न बतुता, अल् बरूनी या परकीय प्रवाशांच्या वृतामध्येही कोकण प्रांताचा उल्लेख सापडतो. टॉलेमीने दक्षिण कोकणास ‘आरिका’ व उत्तर  कोकणास ‘लारिका’ असे म्हटलेले दिसून येते. इ.स.पूर्व 5 व्या शतकापासून बॅबिलोन, रोम या संस्कृतीतील लोकांशी कोकणचे व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते. चैल, सोपारा, कल्याण यासारखी कोकण किनारपट्टीवरील बंदरे या काळापासून नावारुपास आलेली होती.

रायगड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासाकडे डोकावून पाहिल्यास असे दिसून येते की जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या घारापुरी बेटावर हातकु-हाडी व रापी सारखी अश्मयुगीन हत्यारे सापडल्याने या भागामध्ये एक ते दीड लाख वर्षापूर्वीपासून मानवी वस्ती नांदत होती हे स्पष्ट होते. जिल्ह्यातील पाचाड येथील गुहांमध्ये गारगोटी सारखी काही उपकरणे सापडली. यावरून या भागात वीस ते चाळीस हजार वर्षा पूर्वीचे मानवाचे अस्तित्व होते हे ही सिध्द होते. रायगड जिल्ह्यात लोहयुगीन संस्कृतीचा उदय नेमका कधी झाला याविषयी निश्चीत माहिती सांगता येत नाही, मात्र जिल्ह्यातील कुडा, चैल, पाले, कोल, ठाणाळे येथे कोरलेल्या बौध्द लेण्यांवरून असे स्पष्ट होते की बौध्द धर्माच्या स्थापनेनंतर या धर्माच्या प्रसारासाठी कोकणच्या प्रदेषात ठिकठिकाणी अषा प्रकारच्या लेण्यांचे कोरीव काम सुरू झाले. सहयाद्री पर्वताच्या डोंगररांगामध्ये पाषाणात कोरलेल्या या लेण्यांवरून आपल्याला लोहयुगीन संस्कृतीची साक्ष  पटते. ही लेणी आजही त्या काळातील कारागीरांच्या कौशल्याची साक्ष देतात.

या लेण्यांचे खोदकाम हे अनेक वर्षे चालत असे. हे खोदकाम करणारा पाथरवट हा कारागीरांचा वर्ग तेथेच वास्तव्यास राहत असे. बौध्द भिक्षुंकडून या कारागीरांना मोठ्या प्रमाणात मोबदला मिळत असल्याने त्यांच्या अनेक पिढ्याांकडून हे काम केले गेले. काही शिलालेखांमध्ये कारागीरांनी कोरलेल्या लेण्या दान दिल्याचेही उल्लेख सापडतात. लोहयुगीन संस्कृतीमध्ये लोखंडी हत्यारे व कारागीरांची कला यांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यासोबत मानवी वस्त्यांसाठी घरांची निर्मिती करताना मातीच्या भाजलेल्या विटा, लोखंडी खिळे, भाजलेली मातीची कौले गावाभोवतीची तटबंदी, दळणाचे जाते, पाटा-वरवंटा, चलनातील नाणी, किनारपट्टीवरील बंदरे, व्यापार लेखनकला इ. गोष्टींचाहीओघाने उदय व विकास होत गेला.

रायगड जिल्ह्याच्या भूप्रदेषावर इतिहास काळातील वेगवेगळया राजसत्तांनी  आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. या राजसत्तांचा क्रमवार व सुसंगत इतिहास लिखित स्वरूपात सापडत नाही. मात्र जो इतिहास सापडतो त्यात वेगवेगळ्या कालखंडात विविध राजसत्तांचा  या जिल्ह्यावर प्रभाव असल्याचे दिसून येते.

मौर्य काळ:-

उत्तर कोकणचा प्राचीन इतिहास हा प्रामुख्याने तेथील बंदरे, खाड्या, व देशी आणि विदेशी लोकांबरोबर होत असलेल्या व्यापारी व सांस्कृतिक संबंधांचा इतिहास होय. उत्तर  कोकण किनारपट्टीवरील विकसित झालेल्या अनेक प्राचीन बंदरांमधून इ.स.पूर्व 2500 वर्शांपासून ईजिप्त, बॅबिलोन इ. देषांमध्ये जलमार्गाने व्यापार होत होता.

इ.स.पूर्व तिस-या शतकात मौर्य सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत सोपारा (ठाणे) हे मौर्य साम्राज्यातील एक मोठे बंदर होते. येथे सापडलेल्या शिलालेखांवरून अशोकाने बौध्द धर्माच्या प्रसारासाठी काही धर्मप्रसारक या भागात पाठविले होते. दीपवंस व महावंस या पाली भाषेतील ग्रंथामध्ये अशोकाच्या देखरेखीखाली पाटलीपुत्र येथे भरलेल्या तिस-या बौध्द धर्मपरिशदेत ठरल्या प्रमाणे धम्मरक्खित नावाच्या बौध्द भिक्षुकास धर्मप्रसारासाठी अपरांतात पाठविल्याचा उल्लेख सापडतो.

मौर्य काळात उत्तर कोकणात बौध्द धर्माच्या प्रसारासोबत व्यापाराचाही मोठ्या प्रमाणात विकास झाला. कारण बौध्द भिख्खू हे त्या काळातील व्यापारी मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असत आणि ते व्यापा-यांच्या तांड्या सोबत प्रवास करीत असत. या कालखंडामध्ये उत्तर कोकणात अनेक बंदरांचा व्यापारी दृष्टिकोनातून विकास झाला. त्यामध्ये सध्याच्या रायगड जिल्ह्यातील चैल, महाड, मांदाड, राजपूरी, गोरेगाव इ. बंदरांचा समावेश होतो. या काळात या बंदरांमधूनच आषिया व युरोपीय देशांशी मोठया प्रमाणात व्यापार होत होता. भारतात उत्पादित होणा-या विविध चैनीच्या वस्तूंना या देशांमध्ये मोठी मागणी होती. मौल्यवान रत्ने, हिरे-माणके, सुवासिक द्रव्ये, सागवानी लाकूड, मसाल्याचे पदार्थ इ. वस्तू या बंदरांमधून निर्यात होत असत. मौर्य काळात उत्तर कोकणचा स्थापत्य कलेच्या व व्यापाराच्या दृश्टिकोनातून ख-या अर्थाने विकास सुरू झाला.

सातवाहन कालीन रायगड:-

मौर्य साम्राज्यानंतर दक्षिण भारतात नावारुपास आलेली एक प्रभावी राजसत्ता म्हणजे सातवाहन होय. या राजसत्तेचा उत्तर कोकणवर म्हणजेच सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या भूप्रदेशावर प्रभाव होता. प्रतिष्ठान (सध्याचे पैठण) जि. औरंगाबाद ही या राजसत्तेची राजधानी होती. या काळात पैठणपासून जुन्नरपर्यंत व पुढे नाणेघाटातून कल्याण, सोपारा बंदरापर्यंत तसेच बोरघाटातून चैल बंदरापर्यंत व्यापारी मार्ग तयार केले होते. सातवाहन काळातच चैल ही स्थानिक पेठ व्यापारी बंदर म्हणून नावारुपास आल्याचा उल्लेख आणि पेरिप्लस यांच्या वर्णनात सापडतात. ऐतिहासिक दृष्टया रायगड जिल्ह्याचे ज्ञात राज्यकर्ते म्हणून सातवाहन राजसत्तेचा उल्लेख केला जातो.
इ.स.पूर्व पहिल्या शतकातील कलिंगचा राजा खारवेल याच्या हाथीगुंफा येथील शिलालेखावरून सातवाहन राजा पहिला सातकर्णी याचे साम्राज्य उत्तर कोकणवर म्हणजे सध्याच्या रायगड जिल्ह्याच्या भूप्रदेशावर होते हे स्पष्ट होते. इ. सनाच्या पहिल्या शतकात (इ.स.20ते24) होऊन गेलेल्या सातवाहन राजा हाल याने ‘गाथासप्तशती’ हा महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतील 700 ओव्यांचा ग्रंथ संकलित केला. त्यात त्याने स्वतः 44 पद्यरचना केल्या. या ग्रंथात केलेले वर्णन हे पूर्णतः कोकण किनारपट्टीवरील समाज जीवनाचे प्रतिबिंब दर्शविणारे आहे. याचा अर्थ रायगड जिल्हा हा या काळात सातवाहनांच्या वर्चस्वाखाली होता हे निश्चितपणे सांगता येते. गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाने इ. स. 86 ते 110 पर्यंत राज्य केले. त्याने क्शत्रप राजा नहपानाचा (इ. स. 54 ते 100) पराभव केला होता.  यज्ञश्री सातकर्णी हा सातवाहन घराण्यातील राजा या भूप्रदेशावर वर्चस्व गाजविणारा शेवटचा प्रभावी राजा होता. त्याने इ. स. 152 ते 181 पर्यंत राज्य केले. त्यानंतर सातवाहन सत्तेमध्ये फूट पडून अनेक उपशाखा निर्माण झाल्या. जिल्ह्यातील सध्याच्या तळा तालुक्यातील कुडा येथील लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये सामंत, महाभोज, महारथी अशा सातवाहनांच्या प्रतिनिधींचे उल्लेख सापडतात. यावरून रायगडच्या भूप्रदेषावरील सातवाहनांची सत्ता लोप पावत गेल्याचे स्पष्ट होते. मांदाड हे त्यांचे प्रशासकीय केंद्र होते. महाड जवळील पाले येथील लेण्यांवरून तेथेही सातवाहनांचे मांडलिक काणभोज (कुंभोज) यांचे वर्चस्व होते हे स्पष्ट दिसून येते. विद्या देहेजीया या अभ्यासकांनी या लेण्यांमधील अक्शरांच्या धाटणीवरून इसवी सनाचे पहिले शतक हा त्यांच्या निर्मितीचा कालखंड ठरविला आहे. इ.स. 130 मध्ये कुंभोजवंशीय विष्णू पुलित हा राजा या परिसरावर राज्य करीत होता. 

सातवाहन सत्तेच्या काळात रायगडच्या भूप्रदेशात बौध्द लेण्यांचे खोदकाम, किनारपट्टी वरील बंदरांचा विकास, शेती व्यवसायातील उत्पादन वाढ, परदेशी व्यापार या गोष्टींना चालना मिळाली होती. त्यामुळे सातवाहन काळ हा रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने भरभराटीचा काळ होता.

त्रैकूटक कालीन रायगड:-

प्राचीन नाणी व आलेख यांच्या आधारे त्रैकूटक राजसत्तेची माहिती मिळते. या घराण्यातील इंद्रदत्त, द-हसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन आणि विक्रमसेन या पाच राजांच्या कारकीर्दीचा इतिहास समजतो. सातारा जिल्ह्यातील क-हाड येथे सापडलेली बरीचशी नाणी द-हसेन या राजाच्या कारकीर्दीतील होती. रायगड जिल्ह्याच्या भूप्रदेशावर त्रैकूटक घराण्याचा प्रभाव होता. या सत्तेचा नेमका कालखंड सांगता येत नाही. त्र्यं. शं. शेजवळकरांच्या मते ‘अपरान्ताधिपती इंद्रवर्मा’ हे वर्णन म्हणजे त्रैकूटक राजा इंद्रवर्मा याचे होय. कोकणचा राजा इंद्रदत्त्‍ हा काव्य, गायन, नृत्य इ. शास्त्रे जाणणारा होता. ‘कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ हे लोकगीतातील वर्णन हे देखील इंद्रदत्त्‍ राजाशी संबंधित होते असेही शेजवळकर म्हणतात.

त्रैकूटक राजांच्या नाण्यांवर वेगवेगळे आकडे आहेत. मात्र त्यातून निश्चीत कालगणना होत नाही. त्रैकूटक राजांचे विविध ठिकाणी सापडलेले लेख वेगवेगळ्या कालगणना दर्शवितात. त्यातून इ. सनाच्या 2 -या व 3 -या शतकात त्रैकूटकांनी या भूप्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती असे म्हणता येते.
द-हसेन राजाने अश्वमेध यज्ञ केला असल्याचे उल्लेख सापडतात. यावरून हा राजा पराक्रमी असून संपूर्ण कोकणवर त्याची सत्ता होती असे दिसते. कारण ‘अपरान्ताधिपती’ असा त्याचा उल्लेख केला जातो. विक्रमसेन राजानंतर या घराण्याची माहिती उपलब्ध होत नाही. कारण त्यानंतर कलचुरी व गुर्जर यांची झालेली आक्रमणे व कोकणचे मौर्य यांचा झालेला उदय यामुळे त्रैकूटक सत्ता विलयास गेली.

रायगडचे मौर्य:-

इ. सनाच्या चैथ्या शतकात उत्तर कोकणात मौर्य घराण्यातील सुकेतूवर्मन याने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यामुळे यानंतरचे मौर्य शासक कोकणचे मौर्य किंवा उत्तरकालीन मौर्य या नावाने ओळखले जावू लागले. रायगड जिल्ह्याचा संपूर्ण भूप्रदेश या सत्तेच्या वर्चस्वाखाली होता. त्यामुळे त्यांना रायगडचे मौर्य असेही म्हटले जाते. सुकेतूवर्मन याचा इ. स. 400 मधील एक शीलालेख ठाणे जिल्ह्यातील वाडा येथे सापडला. या शिलालेखात ‘भोजानाम् मौर्य धर्ममहाराज’असे वर्णन आहे. याच वर्णनामुळे काही इतिहासकार सुकेतूवर्मनला भोज राजवंशातील मानतात. मात्र काही इतिहासकारांच्या मते भोज हे पद त्याच्या आईचे कूळ आहे. इ. सनाच्या 4 थ्या शतकात गोवा व कर्नाटक प्रांतात भोजवंशाची सत्ता होती. त्यामुळे कोकण प्रांतात असलेल्या मौर्य सत्तेला त्यांच्यातील नातेसंबंधामुळे राज्यस्थापनेसाठी व विस्तारासाठी भोजराजांचेही सक्रीय सहकार्य झाले असावे. त्यामुळेच आपल्या कोरीव लेखात सुकेतूवर्मनने मौर्य या आपल्या वंशनामाबरोबर भोज या नावाचा आवर्जून उल्लेख केल्याचे दिसून येते. इ. सनाच्या 4 थ्या शतकात स्थापन झालेली मौर्य घराण्याची सत्ता 7 व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. बदामीचा चालुक्य सम्राट दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ येथील इ. स. 634-635 मधील शिलालेखात तसे उल्लेख सापडतात. चंद्रवर्मन हा देखील रायगडच्या मौर्य घराण्यातील एक राजा होता. इ. सनाच्या 6 व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये त्याचे या भागावर राज्य होते. भोज आणि कदंब यांच्या संघर्शात त्याने भोजांना मदत केली होती. त्यात कदंबांचा पराभव झाल्याने गोवा-कारवार प्रांतावरही मौर्य सत्तेचा प्रभाव निर्माण झाला होता. चंद्रवर्मनच्या काळात गुजरातच्या सीमेपासून गोवा-कारवारपर्यंतचा संपूर्ण प्रदेश मौर्य सत्तेच्या वर्चस्वाखाली आला होता. गोवा-कारवार प्रदेशावर भोजांची सत्ता असली तरी या सत्तेवर चंद्रवर्मनचे वर्चस्व होते.
मौर्य राजसत्तेची राजधानी ही रायगड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या घारापुरी या बेटावर होती. चालुक्य आणि शिलाहारांच्या शिलालेखात तिचे चंद्रपुरी असे वर्णन आढळते. चंद्रवर्मन राजाच्या नावावरून चंद्र हे उपपद लावले असावे. 8 व्या व 9 व्या शतकातील अरब व्यापा-यांच्या वर्णनात चंद्रपूर हे एक प्रसिध्द बंदर व व्यापारी पेठ असल्याचा उल्लेख सापडतो. दुस-या पुलकेशीच्या शिलालेखातही ‘अपरजलधेर्लक्ष्मी’ म्हणजे पशिचम सागरातील लक्ष्मी असे पुरीचे वर्णन आढळते. याच शिलालेखात रायगडचे मौर्य आणि बदामीचे चालुक्य यांच्यातील दीर्घकालीन संघर्शाचे वर्णन आढळते. पहिला कीर्तिवर्मन, मंगलीश व दुसरा पुलकेशी या चालुक्य सम्राटांनी केलेल्या संघर्शात रायगडवरील मौर्य घराण्याची सत्ता संपुष्टात आली. मौर्यकाळात जिल्ह्याच्या अनेक भागात स्थापत्य कलेमध्ये उत्तम प्रगती झाल्याचे दिसून येते. घारापुरी येथील शिवमंदिर हा त्याचा उत्तम नमुना आहे. कोल, कुडा, महाड, पाले, कान्हेरी येथील काही विहार व चैत्यगृहे मौर्यांच्याच काळात कोरली गेली असावीत.

चालुक्य कालीन रायगड:-

रायगडच्या मौर्य सत्तेवर मात करून हा प्रदेश चालुक्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणला. कीर्तिवर्मन पहिला (इ.स. 567 ते 597) या चालुक्य राजाने मौर्य सत्ता जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने अनेक मोहिमा काढल्या. पुढे त्याचा उत्तराधिकारी मंगलीश (इ.स. 598 ते 610) याने मौर्यांविरुध्दची मोहीम अधिक तीव्र करून मौर्यांच्या नियंत्रणाखालील रेवतीद्वीप म्हणजेच चैल, मुरुड, जंजिरा हा प्रदेश जिंकला. त्यामुळे मौर्य सत्ता उत्तर रायगडपुरती मर्यादित राहिली. पुढे दुसरा पुलकेशी (इ.स. 610ते 642) याने आक्रमण करून मौर्यांची घारापुरी ही राजधानी जिंकून उरलीसुरली मौर्य सत्ता संपुष्टात आणली. पुलकेशीने सुसज्ज आरमाराचा वापर करून सागरी युध्द कौशल्याने मौर्यांचा पराभव केला. पुलकेशीच्या ऐहोळ येथील शिलालेखात तो म्हणतो ‘आपला सेनापती चंडदंड याने या प्रदेशातून मौर्यांना घालवून लावले
नाशिक-त्र्यंबकेश्वर  रस्त्यावरील  अंजनेरी  येथील  ताम्रपटात चालुक्य राजा विक्रमादित्याच्या अधिपत्याखाली पुरीकोकण येथे राज्य करणारा हरिश्चांद्र वंषीय राजा भोगशक्ती याचा उल्लेख सापडतो. दुस-या पुलकेशी नंतर मात्र चालुक्य  सत्तेला उतरती कळा लागली. त्यामुळे रायगडच्या प्रदेशावरील त्यांचे नियंत्रण खिळखिळे बनले. दुसरा कीर्तिवर्मा हा सत्ताधिश असताना त्याच्या अनेक प्रांताधिका-यांनी मध्यवर्ती  सत्तेला आव्हान देऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकीच दंतीदुर्ग याने चालुक्य सत्तेचा पराभव करून स्वतंत्र राष्टकूट सत्तेची स्थापना केली.  

राष्ट्रकूट कालीन रायगड:-

दंतीदुर्गाने स्थापन केलेल्या राष्ट्राकूट सत्तेचे वर्चस्व संपूर्ण महाराष्ट्रावर प्रस्थापित झाले. ठाणे, पुणे, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद इ. ठिकाणी सापडलेल्या ताम्रपटांवरून हे सिध्द होते. दंतीदुर्गानंतर कृष्ण पहिला याच्या कारकीर्दीत संपूर्ण कोकणवर राष्टकुटांनी आपला प्रभाव निर्माण केला होता. पुणे येथील ताम्रपटात कृष्ण पहिला याने कोकणातील काही गावे ब्राम्हणांना दान दिल्याचे उल्लेख सापडतात. राष्ट्रकूट घराण्यात गोविंद तिसरा हा एक बलशाली राजा होता. संजाण येथील ताम्रपटात त्याने कोसल, पाल, कनोज, या राजसत्तांचा पराभव केल्याचे वर्णन सापडते. त्याच्यानंतर सत्तेवर आलेल्या अमोघवर्श (इ.स. 814 ते 880) याच्या कारकीर्दीत बौध्द आणि जैन धर्माच्या प्रसाराला, तसेच साहित्य निर्मितीलाही चालना मिळाली. त्याची कारकीर्द शांततामय अशी  होती. त्याच्या कारकीर्दीत रायगड जिल्ह्याच्या प्रदेषावर शिलाहार कपर्दी हा त्याचा प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होता. इ. स. 854 मधील कान्हेरी येथील शिलालेखावरून हे स्पष्ट होते.
संजाण येथील इ. स. 871 च्या अमोघवर्षाच्या ताम्रपटात संजाण (ठाणे) जवळील झरी वल्लिका (झरोली) हे गाव चार ब्राम्हणांना दान दिल्याचे नमूद केल्याची माहिती उपलब्ध होते. याच लेखात महत्वाची माहिती म्हणजे राष्ट्ऱ़ कूटांची राजधानी असलेले कर्नाटकातील मान्यखेट येथील राजाच्या आज्ञेनुसार हे गाव दान दिले असल्याने या भागावर राष्टकूटांची निर्विवाद सत्ता होती हे स्पष्ट होते. म्हणजेच कर्नाटक पासून दक्षिण व उत्तर कोकण हा पूर्णपणे राष्ट़्राकूटांच्या ताब्यात होता. रायगड जिल्ह्याच्या भूप्रदेशावर राज्य करणारा शेवटचा राष्ट्राकूट राजा म्हणजे कृष्णराज तिसरा हा होय. त्याने गंग, चोल, पल्लव या राजसत्तांना पराभूत करून थेट रामेश्वररपर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केला होता. तसेच उत्तरेकडे माळवा बुंदेलखंड पर्यंत आपली सत्ता प्रस्थापित केली होती. कनोजचे प्रतिहारी व राष्ट्रकूट यांच्यात देखील दीर्घकाळ संघर्श होता. इ. स. 916 मध्ये भारत भेटीवर आलेला अरब प्रवासी अल्-मसूदी याने आपल्या प्रवास वर्णनात लिहिले आहे की ‘कनोजचा राजा आणि राष्ट्रकूट राजा हे जणू एकमेकांचे नैसर्गिक शत्रू वाटतात’ राष्टकूट आणि प्रतिहारी यांच्या दीर्घकालीन संघर्शामुळे व अरबांच्या भारतातील शिकावाने या दोन्ही सत्तांच्या मांडलिक राजांनी उचल खाल्ली. त्यामुळे राष्टकूटांचे वर्चस्व हळूहळू कमी होऊ लागले आणि इ.स. 975 मध्ये चालुक्य वंशाची सत्ता पुन्हा प्रस्थापित होऊन राष्ट्रकूट राजसत्ता संपुष्टत आली.
इ. सनाच्या 7 व्या व 8 व्या शतकात सुलैमान (815), अबू झैद (916), अल्-मसूदी (915), इब्न हौकल (943 ते 968) हे अरब प्रवासी भारतात आले होते. त्यातील अल्-मसुदी हा कोकण भागात आला असता, त्याने ‘चैल या बंदराच्या प्रदेषात सुमारे दहा हजार वयसीर म्हणजे आंतरजातीय विवाहातून जन्मलेले मिश्र किंवा नापाक मुसलमान राहत होते’ असे म्हटले आहे. तसेच ओमान, बगदाद, बसरा येथील अरब व्यापारी या भागात राहत होते असाही उल्लेख केला आहे. अल्-मसूदीच्या वरील वर्णनावरून रायगड जिल्ह्याचे या कालखंडात अरबांषी व्यापारी संबंध होते, तसेच मिश्र विवाहाची कल्पना येथे या काळात रुजलेली होती.

शिलाहार कालीन रायगडः-

उत्तर कोकणात राष्टकूटांचे वर्चस्व संपुष्टात आणून शिहार घराण्याच्या पहिल्याशाखेने आपली स्वतंत्र सत्ता प्रस्थापित केली. शिलाहारांची दुसरी शाखा दक्षिण कोकण व तिसरी शाखा कोल्हापूर येथे होती. इ. स. 800 ते 1265 पर्यंत उत्तर कोकणवर शिलाहार घराण्यातील तिस-या शाखेने राज्य केले. रायगड, ठाणे व मुंबई हा प्रदेश त्यांच्या नियंत्रणाखाली होता. रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी ही या घराण्याची राजधानी होती. या शाखेचा संस्थापक कपर्दी पहिला हा इ. स. 800 ते 825 या काळात सत्तेवर होता. राष्टकूट राजा गोविंद तिसरा याच्या कारकीर्दीत तो उत्तम सेनापती होता. त्याने बजावलेल्या उत्तम कामगिरीबद्दल तिस-या गोविंदने त्याला कोकणचा प्रदेश बक्षिस म्हणून दिला असावा. खारेपाटण येथील ताम्रपटात कपर्दीला शूरवीर म्हटले आहे, तर त्याचा मुलगा पुल्लशक्ती याच्या कान्हेरी येथील (इ.स. 843-844) षिलालेखात ‘महासामंत कोकणवल्लभ’ असा उल्लेख आहे. शिलाहार राजा झंझ (इ.स. 910-930) याच्या  कारकीर्दीत त्याने चैल भागात 12 शिवमंदिरे बांधली असे खारेपाटण ताम्रपटात म्हटले आहे. यावरून तो शिवभक्त होता हे सिध्द होते.
झ्रंझ राजाच्या मृत्यूनंतर छव्दैदेव हा इ. स. 965 ते 975 या दरम्यान शिलाहार सत्ताधीश बनला. तो राष्टकूट राजा तिसरा गोविंद याचा मांडलिक होता. राष्टकूट सत्ता नष्ट झाल्यामुळे छव्दैदेवानंतर अपराजित या राजाने दुःख व्यक्त केले होते असा उल्लेख ठाणे जिल्ह्यातील भाडणे या गावी सापडलेल्या ताम्रपटात दिसून येतो. अपराजित राजाने अनेक सत्तांशी संघर्श केला. त्याचे उत्तरेकडील परमार सत्तेशी  सलोख्याचे संबंध होते. चालुक्य राजा सत्याश्रय याने अपराजितावर स्वारी करून त्यास राजधानीतून पिटाळून लावले. त्यामुळे अपराजिताला थेट समुद्राचा आश्रय घ्यावा लागला होता असा उल्लेख रण्ण या कवीने लिहिलेल्या ‘साहसभीमविजय’ या काव्यात आहे. अपराजितानंतर वज्जड (945ते 965), अरिकेसरी (1015 ते 1022), छित्तराज (1022 ते 1035), इ. राजे शिलाहार घराण्यात होऊन गेले. छित्तराज हा सत्ताधीश असताना गोव्याचा कदंब राजा शष्टदेव याने उत्तर कोकणवर स्वारी करून छित्तराजचा पराभव केला होता. आपले स्वामित्व स्वीकारण्यास भाग पाडून शष्टदेवाने छित्तराजला त्याचे राज्य परत केले होते. छित्तराज हा विद्या व कलांचा आश्रयदाता होता. त्याने अनेक विद्वानांना राजाश्रय दिला होता. ‘उदयसुंदरीकथा’ या काव्यग्रंथाचा कर्ता सोड्डल हा त्याच्या दरबारातील प्रसिध्द कवी होता. अंबरनाथ (ठाणे) येथील भव्य शिवमंदिराच्या बांधकामाचा प्रारंभ ही छित्तराजाने केला होता. पुढे त्याचा धाकटा भाऊ मुम्मुणीराज (1045 ते 1070) याने ते बांधकाम पूर्ण केले. हे मंदिर वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. शिलाहार राजघराण्याच्या ठाणे व कोल्हापूर या दोन शाखा होत्या. त्यांच्यात दुही निर्माण झाल्यामुळे गोव्याचा कदंब राजा जयकेशी याने शिलाहारांच्या ठाणे शाखेवर आक्रमण केले. यावेळी अनंतदेव (1070 ते 1127) हा शिलाहार सत्ताधीश होता. यावेळी झालेल्या संघर्शात अनंतदेव मारला गेला त्यामुळे उत्तर कोकणवर कदंबांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. इ. स. 1127 मध्ये अपरादित्य (1127 ते 1148) याने संपूर्ण कोकण पुन्हा शिलाहारांच्या ताब्यात आणला.
अपरादित्याने आपले दोन मुलगे विक्रमादित्य व हरपाळदेव यांच्यात आपल्या राज्याची वाटणी केली. त्यात उत्तर कोकण हरपाळदेव (1148 ते 1155) याच्याकडे तर दक्षिण कोकण विक्रमादित्याकडे दिले. हरपाळदेवाचे 1149, 1150 व 1153 असे तीन शिलालेख सापडले आहेत. या लेखांच्या आधारे तो 1139 ते 1155 या काळात उत्तर कोकणवर राज्य करीत होता असे दिसते. हरपाळदेवाच्या कारकीर्दीत उत्तर कोकणात संस्कृत मिश्रित मराठी मध्ये लेख लिहिण्यास  सुरुवात  झाली. हरपाळदेव नंतर मल्लिकार्जून (1155 ते 1170) हा उत्तर कोकणचा सत्ताधीश झाला. त्याचे चिपळूण व वसई येथे कोरीव लेख सापडले आहेत. चालुक्य राजा कुमारपाल याला मल्लिकार्जून याने तीव्र प्रतिकार केला होता. तसा उल्लेख हेमचंद्र लिखित ‘कुमारपालचरित्र’ या ग्रंथात दिसतो. या संघर्शात मल्लिकार्जून ठार झाला. त्याच्यानंतर अपरादित्य दुसरा (1170 ते 1197), अनंतदेव दुसरा (1197 ते 1200), केशीदेव दुसरा (1200 ते 1245) हे राजे शिलाहार घराण्यात होऊन गेले. केशीदेव दुसरा याच्या कारकीर्दीतील इ. स. 1203 व 1238 या वर्षीचे दोन शिलालेख सापडले आहेत.
या शिलालेखात केशीदेवराय-शिलाहार नृपती, भइर्जु सेणूई-महाप्रधान या व्यक्तीनामांचा समावेश आहे. या लेखाचा सारांश असा की, कोकणचा राजा चक्रवर्ती केशीदेवराय याचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने गावातील नऊ कवली धान्य देवीसाठी दान दिले आहे असे सांगण्याचा आहे. या लेखाचा शेवट शपवाचक वचनांनी झाला आहे. मराठी भाषेतील उपलब्ध लेखांतील हा पहिला शिलालेख होय असे पुरातत्व तज्ज्ञ श. गो. तुळपुळे यांचे मत आहे. केशीदेवानंतर शिलाहार सत्तेवर आलेला राजा म्हणजे सोमेश्वर हा होय. तो शिलाहार घराण्यातील शेवटचा सत्ताधीश होय. सोमेश्वर राजाचे देखील दोन शिलालेख सापडले आहेत. इ.स. 1259 चा शिलालेख रायगड जिल्ह्यातील उरण जवळील रानवडी येथे, तर 1260 चा शिलालेख पनवेल तालुक्यातील चाणजे येथे सापडला. सोमेश्वर राजाची कारकीर्द इ.स. 1255 ते 1265 अशी होती. तो गादीवर असताना देवगिरीचा यादव राजा कृष्णदेव याने आपला सेनापती मल्ल याला कोकणवर स्वारी करण्यासाठी पाठविले होते. त्याने सोमेश्वराचा पराभव केला. कृष्णदेवानंतर गादीवर आलेल्या महादेव या राजाने कोकणवर पुन्हा स्वारी केली. यावेळी तो स्वतः भलीमोठी फौज घेऊन आला होता. महादेवाच्या फौजेपुढे टिकाव लागणार नाही हे पाहून सोमेश्वराने समुद्राकडे पळ काढला. महादेवाने सोमेश्वराचा समुद्रापर्यंत पाठलाग केला. समुद्राचा आसरा घेत असतानाच त्याचा बुडून मृत्यू झाला. सोमेश्वराच्या मृत्यूमुळे कोकणावरील शिलाहारांची सत्ता पूर्णपणे संपुष्टात आली.

मुंबईतील बोरीवली स्थानकाजवळ काही विरगळ शिलांवर एका सागरी युध्दाची शिल्पकृती आहे. ती शिलाहार राजा सोमेश्वर व यादव राजा महादेव यांच्यातील नौकायुध्दाची असावी. हे युध्द इ.स. 1265 मध्ये झाले असावे. या युध्दातील विजयानंतर यादवांनी उत्तर कोकणवर अच्युत नावाचा राज्यपाल नियुक्त करून त्याच्याकरवी प्रशासकीय कारभार सुरू केला. 1272 च्या ठाणे येथे सापडलेल्या शिलालेखावरून हे स्पष्ट होते.

शिलाहार कालखंड हा रायगड तथा कोकणच्या दृष्टीने महत्वाचा कालखंड होता. शिलाहारकालीन अनेक लेखांमधून त्यांच्या आर्थिक, सामाजिक व धार्मिक बाबींवर प्रकाश टाकता येतो. शिलाहार घराण्यातील बहुतांशी राजे हे राष्ट्रकूट, चालुक्य, कदंब, परमार या राजसत्तांचे मांडलिक होते, मात्र त्यांना ब-याच अंशी अंतर्गत स्वायत्तता होती. ते स्वतंत्रपणे करवसुली करीत होते. शिलाहार राजे हे हिंदू धर्माचे अनुयायी होते. मात्र त्यांच्या काळात धार्मिक सलोख्याचे वातावरण होते. बौध्द आणि जैन धर्माचे लोकही गुण्यागोविदाने नांदत होते.
मुंबई जवळील कान्हेरी येथे बौध्द धर्माचे एक मुख्य केंद्र होते. या केंद्रासाठी राज्यकत्र्यांकडून आर्थिक मदत मिळत असे. शिलाहार राजे शैव पंथीय असल्याने शिवाच्या अनेक मंदिरांना ते देणग्या देत असत. पुरोहित वर्गाला काही गावे इनाम दिली जात. या संबंधीचे उल्लेख अनेक ताम्रपटात सापडतात.

मध्ययुगीन कालखंड:-

सर्वसाधारणपणे 13 व्या शतकापासून भारताच्या मध्ययुगीन इतिहासाला सुरूवात होते. 13 व्या शतकाच्या सुरूवातीलाच दिल्लीमध्ये सुलतानी सत्त्ेची स्थापना झाल्याने भारतात प्रथमच मुस्लिम अंमल सुरू झाला. या घटनेने उत्तर भारतामध्ये राजकीय व सामाजिक जीवनात फार मोठया प्रमाणात उलथापालथी सुरू झाल्या. दक्षिण भारतात मात्र अजूनपर्यंत मुस्लिम सत्तेचा शिरकाव झालेला नव्हता. याच शतकाच्या शेवटच्या दशकात उत्तरेकडून दक्षिण भारतात मुस्लिम सत्तेचे आक्रमण सुरू झाले. यावेळी दक्षिण भारतात देवगिरी येथे यादवांची प्रभावी सत्ता होती. अल्लाउद्दिन खिल्जीच्या आक्रमणाने यादव सत्तेचा पराभव झाला आणि दक्षिण भारतातही मुस्लिम सत्तेचा प्रसाराला सुरुवात झाली. सुलतानी सत्तेच्याच काळात विजयनगर, बहामनी, सिद्दी, मराठे तसेच पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच या युरापीय सत्तांनी दक्षिण भारतावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रायगड जिल्ह्याच्या भूप्रदेशावर या वरील सत्तांनी वेगवेगळ्या कालखंडात वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून येते. या मध्ययुगीन काळात रायगडच्या राजकीय  इतिहासात बरीच राजकीय स्थित्यंतरे घडून आली.

यादव कालीन रायगड:-

महाराष्ट्रातील आजच्या खानदेशच्या प्रदेशात इ. सनाच्या 9 व्या शतकात यादव घराण्याचा उदय झाला होता. दृढप्रहारी हा यादव वंशातील पहिला ज्ञात राजा होता. इ.स. 860 ते 880 अशी त्याची राजकीय कारकीर्द होती. याच घराण्यातील 5 वा भिल्लम याने महाराष्ट्रातील राष्ट्रकूट  सत्तेला उतरती कळा लागली असताना मराठवाड्यातील देवगड उर्फ देवगिरी येथे आपली राजधानी वसवून स्वतंत्र व बलाढ्या अशी सत्ता स्थापन केली. पुढील काळात या घराण्यातील अनेक राजांनी यादव राज सत्तेला वैभवाच्या शिखरावर नेले. 1246 ते 1261 या काळात देवगिरीवर कृष्णदेव हा राजा राज्य करीत होता. यावेळी उत्तर कोकणवर शिलाहारांची सत्ता होती. साम्राज्यविस्ताराचा एक भाग म्हणून कृष्णदेवाने आपला सेनापती मल्ल यास उत्तर कोकणवर पाठविले. मात्र या मोहिमेत त्याला फारसे यश मिळाले नाही. कृष्णदेवानंतर देवगिरीवर महादेवराय हा पराक्रमी राजा सत्तेवर आला. 1261 ते 1270 अशी त्याची कारकीर्द होती. महादेवरायाने रायगडवर सत्ता असलेल्या शिलाहार राजा सोमेश्वर याच्यावर 1265 च्या दरम्यान आक्रमण केले. यावेळी झालेल्या संघर्शात सोमेश्वराचा टिकाव लागला नाही. उभयतांमध्ये झालेल्या सागरी युध्दात सोमेश्वर राजा मारला गेला. त्यामुळे उत्तर कोकणचा म्हणजेच रायगडचा भूप्रदेशही यादव सत्तेच्या प्रभावाखाली आला. महादेवराय यादवाने हा भाग जिंकल्यानंतर येथील शासक म्हणून आपला पुत्र जैनुगी (तिसरा) याची नियुक्ती केली होती.
महादेवराय राजाच्या मृत्यूनंतर रामदेवराय हा देवगिरीचा राजा झाला. त्याने 1271 ते 1311 या कालावधीत राज्य केले. त्याच्या कारकीर्दीत यादव सत्ता वैभवाच्या अत्युच्च शिखरावर होती. त्याने मुंबई जवळील माहिम बंदर, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, संगमेश्वर या ठिकाणच्या सामंतांचा पराभव करून अच्युत नायक यास कोकण प्रांताचा प्रांताधिकारी म्हणून नियुक्त केले. कोकणात अनेक ठिकाणी सापडलेल्या यादव कालीन शिलालेखांत यादवांच्या प्रांताधिका-यांची नावे आहेत. कान्हेरदेव या प्रांताधिका-याने कोकणातील अनेक श्रीकृष्ण मंदिरांना भूमीदान दिल्याचा उल्लेख सापडतो. इ. स. 1300 मधील ठाणे जिल्ह्यातील आगासन येथे सापडलेल्या शिलालेखात रामदेवरायाचा ‘पश्चिम समुद्राधिपती’ असा उल्लेख आहे. तर आक्षी (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील रामदेवराय याच्या इ.स. 1291 मधील संस्कृत मिश्रीत मराठी भाशेतील शिलालेखात रामदेवरायाचा प्रांताधिकारी जाईदेव याचा मुलगा ईश्वरदेव क्षत्रिय याने आक्षी येथील कालिका देवीच्या मंदिराला जमीन दान केल्याचा उल्लेख आहे. याच शिलालेखात यादवांच्या प्रांताधिका-यांनी कोकणातील पूर्वीच्या वहिवाटदारांना त्यांचे पूर्वीचे हक्क व अधिकार परत बहाल केल्याचा उल्लेखही सापडतो. त्यावर सूर्य व चंद्र यांच्या प्रतिमाही आहेत. यादवकालीन शिलालेखांमधून कोकणातली यादवांची सत्ता कृशी वृध्दिंगत होत गेली याची विस्तृत माहिती मिळते.

विजयनगरच्या अधिपत्याखालील रायगड:-

इ. स. 1206 मध्ये दिल्लीमध्ये सुलतानी सत्तेची स्थापना केली. या सत्तेचा अल्पावधीतच संपूर्ण उत्तर भारतात विस्तार झाला. दिल्लीवर खिल्जी घराण्याची सत्ता असताना अल्लाउद्दिन खिल्जीने दक्षिण भारतावर आक्रमण केले. देवगिरीचे दक्षिण भारतातील एक प्रभावी असलेले राज्य त्याने निशप्रभ केले. पुढे महमद- बिन-तुघलाकाने सुलतानी सत्तेची राजधानीच देवगिरी (दौलताबाद) येथे आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या काळात या सत्तेचा विस्तार दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात झाला होता. मात्र त्याच्याविरुध्द अनेक ठिकाणी बंडाळ्या देखील तितक्याच प्रमाणात घडून आल्या होत्या. दक्षिण भारतात सुलतानी सत्तेच्या नियंत्रणाखाली असलेल्या आमीरांनी तुघलकाविरूध्द बंडाळ्या सुरू केल्या. अनागांेदी येथे घडून आलेल्या अशाच एका बंडाळीचा बीमोड करण्याची जबाबदारी दिलेल्या हरिहर व बुक्कराय या दोघा हिंदू बंधूंनी उठाववाल्यांचे नेतृत्व स्वीकारून सुलतानी  सत्तेला शह दिला आणि तुंगभद्रा नदीच्या तीरावर 1336 मध्ये स्वतंत्र हिंदू सत्तेची स्थापना केली जी पुढे विजयनगरची सत्ता म्हणून नावारुपास आली.

विजयनगरच्या राज्यकत्र्यांना सागरी वर्चस्व आवश्यक वाटत होते. त्यामुळेच त्यांनी कोकण प्रांताकडे आपले लक्श केंद्रित केले. 1377 पर्यंत कोकणच्या काही भागावर विजयनगरचे वर्चस्व होते. 1420 च्या सुमारास विजयनगरच्या राजवटीने दाभोळ व चैल बंदर जिंकले. त्याचवेळी जिल्ह्याच्या काही भागात स्थानिक सत्ताधा-यांची हुकुमत चालत असे. जिल्ह्यातील नागोठणे येथे असेच एक सत्ताकेंद्र या काळात अस्तित्वात होते. विजयनगरचा फार मोठा प्रभाव रायगड जिल्ह्यावर पडलेला दिसून येतो. रायरी तथा रायगड किल्ल्यावर पाळेगारांची सत्ता होती. हे पाळेगार विजयनगरच्या नियंत्रणाखाली होते.

बहामनी कालीन रायगड:-

दक्षिणेकडील या बंडखोर आमीरांचा विश्वासघाताने काटा काढण्याची योजना तुघलकाने आखली. मात्र आमीरांना या कटाची माहिती मिळाल्याने त्यांनी तुघलकाच्या दूतांनाच ठार केले आणि आपला नेता जाफरखान उर्फ हसनगंगू यास राज्याभिषेक करून गुलबर्गा येथे 1347 मध्ये बहामनी या स्वतंत्र सत्तेची स्थापना केली. विजयनगर आणि बहामनी या दोन्ही सत्तांच्या सीमा एकमेकांना भिडलेल्या असल्याने त्यांच्यात सतत संघर्ष होत असे. आपले वर्चस्व सिध्द करण्यासाठी या दोन्ही सत्ता आसपासच्या प्रदेशावर आक्रमण करीत असत. रायगड जिल्ह्यात व्यापारी दृष्टया अनेक महत्वाची बंदरे असल्याने हा प्रदेश या दोन्ही सत्तांसाठी महत्वाचा वाटत होता.  1390 च्या सुमारास बहामनींनी कोकणातील ब-याच बंदरांवर ताबा मिळविला. 1429 मध्ये त्यांनी कोकण किनारा पूर्णपणे आपल्या नियंत्रणाखाली आणला. 1436 मध्ये रायरीच्या प्रमुख असलेल्या पाळेगारांकडून त्यांनी खंडणी वसूल केली.

बहामनी सुलतान अल्लाउद्दिन अहमदशहा (1436 ते 1458), हुमायूनशहा (1458 ते 1461), निजामुद्दिन अहमदशहा (1461 ते 1462), शमसुद्दिन महमदशहा (1461 ते 1482), यांच्या काळात मुख्य प्रधान असलेल्या महमद गवान याने बहामनी सत्तेच्या विस्तारासाठी  इ.स. 1472 मध्ये कोकणवर चढाई केली होती. या स्वारीत त्याने संपूर्ण कोकण, गोवा हा प्रदेश जिंकून अरबी समुद्रापर्यंतचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. यावेळी गवानला कोकणच्या प्रदेशात अफाट संपत्ती व मौल्यवान वस्तू सहजगत्या मिळाल्या. या स्वरीतील लूट त्याने सुलतानाला सुपूर्द  केली. खुश होऊन शमसुद्दिन महमदशहा याने गवानला आमीर हा किताब बहाल केला. महमद गवानने कोकणवर मिळविलेला हा विजय आणि शेजारच्या हिंदू-मुस्लिम राज्यांशी ठेवलेले सलोख्याचे संबंध यामुळे बहामनी राज्याला स्थैर्य प्राप्त होऊ शकले. बहामनी राज्यात फूट पडल्यानंतर ज्या पाच स्वतंत्र शाहया निर्माण झाल्या त्यापैकी अहमदनगरच्या निजामशहाने कोकण प्रांत आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याने रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील बंदरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
15 व्या शतकाच्या मध्यास पूर्व आफ्रिकेतील अॅबेसिनिया मधील हबशी लोक भारतात येऊ लागले. त्यांनी बहामनी सत्तेच्या दरबारात नोक-या मिळविण्यास सुरूवात केली. 1490 मध्ये निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने रायगडच्या भूप्रदेशातील दंडाराजपुरी व जंजिरा ही ठिकाणे जिंकली. याकुतखान सिद्दी या हबशी सरदाराने निजामशहाच्या मार्गदर्शनाखाली कपटाने जंजिरा किल्ला स्थानिक कोळ्यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला. या विजयामुळे अहमदनगरच्या निजामशाहीचे रायगडच्या भूप्रदेशावर प्रभुत्व प्रस्थापित झाले. निजामशहाने या किल्ल्याच्या आश्रयाखाली आपले आरमारही निर्माण केले. निजामशहाचा परदेशाशी होणारा व्यापार व मक्केला जाणारे यात्रेकरू यांना संरकृष्ण देण्याच्या हेतूने ही आरमाराची निर्मिती केली होती. 1509 मध्ये चैल बंदर गुजरातच्या सुलतानाकडून पोर्तुगीजांच्या ताब्यात आले. चैलपर्यंतचा भाग गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. गुजरातचे सुलतान 1540 पर्यंत पेणजवळील साक्षी गडावर आपला ताबा टिकवून होते. त्यानंतर हा किल्ला निजामशहाच्या ताब्यात आला. बाणकोटच्या खाडीपर्यंतचा प्रदेश विजापूरच्या आदीलशहाच्या ताब्यात होता. 1636 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीचा मुघलांनी पाडाव केल्यानंतर रायगड जिल्ह्याचा भूप्रदेश पूर्णपणे विजापूरच्या आदिलशहाच्या नियंत्रणाखाली आला. 1656 पर्यंत आदिलशहाचा जावळी प्रांताचा वतनदार असलेल्या चंद्रराव मोरे याच्या ताब्यात रायगड जिल्ह्याचा बराचसा भूप्रदेश होता.

पोर्तुगीजांचा शिरकाव:-

वास्को-द-गामा हा पोर्तुगीज दर्यावर्दी सन 1498 मध्ये समुद्रमार्गाने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कालिकत येथे उतरला. त्याने प्रथमच युरोपीयनांना हा मार्ग माहित करून दिला. ही घटना भारताच्या इतिहासावर सर्वच दृष्टिकोनातून दूरगामी परिणाम करणारी ठरली. विषेशतः भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील भूप्रदेशांवर त्याचे जलदगतीने पडसाद उमटले. रायगड जिल्ह्यातील चैल हे या काळातील व्यापारी दृष्टीने नावारूपास असलेले बंदर होते. या बंदरावर यावेळी अहमदनगरच्या निजामशहाचे वर्चस्व होते. 1505 मध्ये पार्तुगीजांचे चैलमध्ये आगमन झाले. या काळात संपूर्ण भारतात छोट्या-मोठ्या राजसत्ता आपापसातील संघर्शात गुंतल्याचा फायदा पोर्तुगीजांसारख्या परकीय सत्तांनी घेतला. त्यांनी चैल-रेवदंडा या बंदरावर आपली नजर वळविली. अहमदनगरच्या बुरहान निजामशहाच्या (1508-1553) परवानगीने पोर्तुगीजांनी 1516 मध्ये चैल-रेवदंडा येथे एक व्यापारी वखार बांधली व तेथेच एक किल्लाही बांधला. या घटनेने पोर्तुगीजांचा गुजरातच्या सुलतानाशी संघरर्ष सुरू झाला. कारण या भूप्रदेशामध्ये गुजरातच्या सुलतानाचाही वावर होता. पोर्तुगीजांनी सुलतानावर कुरघोडी करून पश्चिम किनारपट्टीवरील वसई, ठाणे, मुंबई ही महत्वाची ठाणी सुलतानाकडून हिसकावून घेतली आणि उत्तर कोकणवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पोर्तुगीजांच्या नौदलाला प्रतिकार करणारे आरमार भारतीय सत्ताधीशांकडे नसल्याने अरबी समुद्रात पोर्तुगीजांचा अनिर्बंध वावर सुरू झाला. गोवा, दमण, दीव, वसई ही महत्वाची किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात घेऊन त्यांनी या ठिकाणी वखारी स्थापन केल्या. तसेच संरकषणासाठी तेथे किल्लेही बांधले. पोर्तुगीजांनी प्रत्येक बंदराच्या ठिकाणी जहाज बांधणीही सुरू केली. पुढील काळात पोर्तुगीजांच्या परवानगी शिवाय अरबी समुद्रात व हिंदी महासागरात दिल्लीचे मुघल, विजापूरचा आदीलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा यांनाही संचार करता येत नसे. पश्चिम किनारपट्टीवर गोव्या पासून दमण-दीव पर्यंत पोर्तुगीजांची अनिर्बंध सत्ता होती.
1521 मध्ये आदीलशाही फौजांनी चैलवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. या घटनेचा पोर्तुगीजांना चांगलाच हादरा बसला. मात्र निजामशहाने पोर्तुगीजांना साथ दिल्याने चैलवरील पोर्तुगीजांचे प्राबल्य आबाधित राहिले. 1524 मध्ये गुजरातच्या सुलतानाने चैलवर तुर्की जहाजांच्या साहाय्याने आरमारी हल्ला चढविला. मात्र पोर्तुगीज व अहमदनगरचा निजामशहा यांनी संयुक्तपणे हा हल्ला परतवून लावला. बुरहान निजामशहाच्या मृत्यूनंतर हुसेन निजामशहा सत्तेवर आला. त्याच्या काळात पोर्तुगीज व अहमदनगर संबंधात तणाव निर्माण झाला. चैलच्या नजिक असलेल्या कोर्लई येथे भक्कम किल्ला बांधण्याची पोर्तुगीजांनी तयारी सुरू केली होती. त्याला हुसेन निजामशहाने तीव्र विरोध केला. 1570 मध्ये मुर्तझा निजामशहा हा सत्तेवर आल्यावर विजापूरच्या आदीलशहाच्या मदतीने त्याने फेब्रुवारी 1571 मध्ये चैलवर आक्रमण करून चैलला वेढा घातला. मात्र साडेचार महिने होऊनही यश येत नाही हे पाहून निजामशहाने पोर्तुगीजांषी शांततेचा तह करून माघार घेतली. 1577 मध्ये पोर्तुगीजांनी रेवदंडा किल्ल्याच्या संरक्शणासाठी शहराच्या दक्षिण बाजूने भक्कम तटबंदी उभारली. पोर्तुगीजांच्या व्यापारी धोरणामुळे चैल-रेवदंड्यााची मोठया प्रमाणात भरभराट होऊ लागली.
1583 मध्ये एका डच प्रवाशाने चैलला भेट दिली असता या बंदराचे वर्णन करताना त्याने नमुद केले आहे की, ‘तटबंदी असलेले एक चांगले बंदर व व्यापारासाठी प्रसिध्द असे हे शहर आहे.’ 1592 मध्ये अहमदनगरच्या बुरहान निजामशहा (दुसरा) याचे पोर्तुगीजांशी बिनसले. त्याने चैलवर आपले सैन्य पाठवून कोर्लई येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला. किल्ला बांधून झाल्यावर कुंडलिका नदीच्या पलिकडून निजामशहाच्या सैन्याने पोर्तुगीजांवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यांना प्रतिकार करण्यासाठी पोर्तुगीज गव्हर्नरने स्थानिक लोकांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. स्थानिक मच्छीमारी करणा-या लोकांना त्यांच्या छोट्या-छोट्या होड्यामधून कोर्लई किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. स्थानिक लोकांनी एका हत्तीचा मृतदेह प्रवेशद्वारापाशी ठेवला. या संघर्शात किल्ल्यातील सैन्याचा प्रतिकार तोकडा पडला व  सप्टेंबर 1594 मध्ये हा  किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. स्थानिक लोकांनी या कामात शैर्य दाखविल्याने पोर्तुगीजांकडे त्यांचे महत्व  वाढले. पुढे-पुढे पोर्तुगीजांनी स्थानिकांना अनेक अधिकार बहाल केले. ग्रामीण भागात आपल्या इच्छेनुसार न्यायदान करण्यासाठी न्यायप्रमुख निवडण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला.

रायगड जिल्ह्याची जवळपास संपूर्ण किनारपट्टी पोर्तुगीजांच्या वर्चस्वाखाली होती. मात्र भारतात डच व इंग्रजांचे आगमन झाल्यानंतर पोर्तुगीजांची पिछेहाट सुरू झाली आणि अनेक बंदरे व किनारपट्टीवरील किल्ले पोर्तुगीजांच्या हातातून निसटले आणि ते इंग्रज व डचांच्या ताब्यात गेले.

मराठी सत्तेचा कालखंड:-

मराठी सत्तेच्या उदयापूर्वी रायगड जिल्ह्याच्या विविध भूभागावर विजापूरचा आदिलशहा, अहमदनगरचा निजामशहा, जंजि-याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईचे इंग्रज यांचे वर्चस्व होते. जिल्ह्याचा महाड, माणगाव, पोलादपूर हा परिसर आदिलशहाच्या जावळी प्रांतात समाविष्ट होता. त्यावर जावळीचे वतनदार मोरे यांचे वर्चस्व होते. रायगड किल्ला जो पूर्वी रायरी नावाने ओळखला जाई तो देखील जावळीचे वतनदार मोरे यांच्या ताब्यात होता. पश्चिम किनारपट्टीवरील मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, रोह्यापर्यंतचा भाग जंजि-याच्या सिद्दीच्या प्रभावाखाली होता. जिल्ह्याच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर पनवेल उरण या भागावर मुंबईकर इंग्रजांनी आपले बस्तान बसविले होते. अलिबाग, चैल-रेवदंडा, पेण या भागात अहमदनगरच्या निजामशहाने आपला प्रभाव निर्माण केला होता. गोव्याचे पोर्तुगीजही पश्चिम किनारपट्टीवरील बंदरांवर लक्श केंद्रित करून आपला व्यापार वाढविण्याच्या प्रयत्नात होते. निजामशहाच्या परवानगीने त्यांनी चैल येथे व्यापारी वखार स्थापन केली होती. तर दमण, दीव, वसई ठाणे ही बंदरे आपल्या ताब्यात घेऊन पश्चिम किनारपट्टीवर आपला प्रभाव निर्माण केला होता. जिल्ह्याच्या सागरी हद्दीतील घारापुरी हे बेट 1534 मध्ये पोर्तुगीजांनी काबीज केले होते. एकूणच शिवाजी महाराजांचा उदय होण्यापूर्वी रायगड जिल्हा हा अनेक सत्ताधीशांनी गिळंकृत केला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 मध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर पुणे प्रांतात या स्वराज्याचा विस्तार सुरू झाला. रायगड जिल्ह्याशी त्यांचा पहिला संबंध आला तो जावळीच्या मो-याबरोबर झालेल्या संघर्षाच्या निमित्ताने. शिवाजी महाराजांनी मो-यांचा पाडाव करून जावळी प्रांत आपल्या ताब्यात घेतला. (जानेवारी 1656) या संघर्शात हणमंतराव मोरे मारला गेला व प्रतापराव मोरे विजापूरास पळून गेला. तर यशवंतराव मोरे रायरीच्या किल्ल्यात जाऊन लपून बसला. त्यामुळे रायरी ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी हैबतराव सिलिमकर यांच्या नेतृत्वाखाली रायरीवर फौज पाठविली. यशवंतराव मो-याने तीन महिने किल्ला लढविला, मात्र पुढे त्याचा नाईलाज होऊन त्याने हैबतरावाशी तहाची बोलणी सुरू केली. महाराजांनी यशवंतराव मोरेला मुख्य गुन्हेगार ठरवून ठार केले तर त्याच्या दोन्ही मुलांना पुण्यामध्ये बंदीवासात ठेवले. अशा प्रकारे मे 1656 मध्ये रायरीचा किल्ला व त्याच्या आसपासचा आदिलशाही अंमलाखालील प्रदेश स्वराज्यामध्ये समाविष्ट झाला. हा प्रदेश ताब्यात आल्याने त्याचा स्वराज्याच्या उभारणीसाठी फार मोठा फायदा झाला. या भागातील शूर व काटक मावळे स्वराज्याच्या सेनेमध्ये सामील झाले. रायरीचा किल्ला ताब्यात आल्याने त्याची पुनर्बांधणी करून त्याला अभेद्य बनविले. व पुढे हाच किल्ला आपल्या स्वराज्याच्या राजधानीसाठी पक्का केला. या विजयाने मावळ भागातील सरदारांवर महाराजांचा वचक निर्माण झाला. विजापूरच्या आदिलशहाची कोकण प्रांतावरची पकड सैल झाली. यावेळी आर्थिक अडचणीत आलेल्या आदीलशहाने आपला कल्याण प्रांताचा सुभेदार मुल्लाना अहमद यास खजिना घेऊन बोलाविले तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यास वाटेतच गाठून त्याच्या जवळचा सर्व खजिना हस्तगत केला.

जावळीच्या विजयानंतर शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागावर आपले लक्श केंद्रित केले. कल्याण-भिवंडीकडे मोहीम काढली व त्या भागातील डोंगरी किल्ले जिंकण्यास सुरूवात केली. त्यामुळे सुधागड-पाली, कर्जत, पेण या तालुक्यांतील भूप्रदेषावर मराठी सत्तेचा प्रभाव निर्माण झाला. या भागातील माहुली, तळागड, प्रबळगड, घोसाळगड, चैल-रेवदंडा इ. किल्ले स्वराज्याच्या प्रदेशात समाविष्ट झाले. स्वराज्याच्या सीमेलगत असलेल्या जंजि-याच्या सिद्दीचा येथील स्थानिक लोकांना फार मोठा उपद्रव होत असे. या लोकांनी सिद्दीविरुध्द शिवाजी राजांकडे मदत मागितली. त्यामुळे 1659 पासूनच शिवाजी राजे व जंजि-याचा सिद्दी यांच्यात संघर्शाला सुरूवात झाली. जंजि-यावर अंकुश ठेवता यावा म्हणून त्यांनी दंडराजापूरी जिंकून त्यावर एक डोंगरी किल्ला बांधला. सिद्दीच्या ताब्यातील अर्ध्याहून अधिक भूभाग महाराजांनी जिंकून तो स्वराज्यात समावष्ट केला. सिद्दी आणि मराठे यांच्या संघर्षात सिद्दीला गोव्याच्या पोर्तुगीजांनी व मुंबईकर इंग्रजांनी मदत केली. या संघर्षाच्या निमित्ताने महाराजांनी सागरी वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या हेतूने आरमाराच्या उभारणीला प्रारंभ केला. कुलाबा किल्ल्याच्या आजुबाजूचा सिद्दीच्या ताब्यातील निम्म्याहून अधिक भाग महाराजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणला. 1659 मध्ये शामरावपंत पेशवे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सिद्दीला नामशेष करण्यासाठी मोठी फौज पाठविली मात्र या मोहिमेत मराठ्यांना पराभव पत्करावा लागला.

शिवाजी महाराजांनी युरोपीय सत्तांचा धोका ओळखला होता. त्यामुळे या सत्तांना शह देण्यासाठी भक्कम आरमाराची निर्मिती सुरू केली. कुलाबा किल्ला हे आरमाराचे प्रमुख केंद्र बनविले. गोव्याच्या पोर्तुगीजांना शह देण्यासाठी सिंधुदुर्ग, जंजि-याच्या सिद्दीला शह देण्यासाठी पद्म, तर मुंबईकर इंग्रजांना शह देण्यासाठी खांदेरी हे जलदुर्ग उभारले. 1660 च्या दरम्यान त्यांनी कल्याण, भिवंडी व पेण येथे 20 गुराबा बांधावयास घेतल्या त्यांच्या आरमाराची धुरा मायनाक भंडारी, दौलतखान, वेंटाजी सरंगी उर्फ दर्यासारंग यांच्याकडे होती. 1669 च्या खांदेरीच्या लढाईच्या वेळी शिवाजी महाराजांच्या आरमाराची इंग्रजांनीही प्रशंसा केली होती. तसेच शिवाजी महाराजांचे भूगोल विषयक ज्ञान व दुर्गबांधणीच्या कौशल्याचा 1672-74 मध्ये भारत भेटीवर आलेल्या अॅबे कॅरे या फ्रेंच प्रवाशाने उल्लेख केला आहे. कावेरी नदीपासून सिंधू नदीपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्न होते असेही अॅबे कॅरे याने नमुद केले आहे.
शिवाजी महाराजांनी रायगड जिल्ह्याचा बहुतांशी भाग किंबहुना संपूर्ण कोकण
किनारपट्टी ताब्यात घेतल्यानंतर स्वराज्य संरक्शणासाठी या प्रदेशाची उपयुक्तता जाणली आणि याच भूप्रदेषातील रायगड हा अभेद्य व दुर्गम असा किल्ला राजधानीसाठी निवडला. 1664 च्या सुरतच्या लुटीतून त्यांनी रायगड किल्ल्याची मजबूत बांधणी केली. पुढे 6 जून 1674 रोजी त्यांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकाच्या विधीमुळे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला एक स्वतंत्र व घटनात्मक अधिष्ठन प्राप्त झाले. त्यामुळे इतर स्वकीय व परकीय सत्तांमध्येही या मराठी सत्तेबद्दल वचक निर्माण झाला. यावेळेपर्यंत रायगड जिल्ह्यातील बराचसा भाग मराठ्याच्या वर्चस्वाखाली आला होता.

1680 मध्ये शिवाजी  महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांकडे आली. त्यांच्या कारकीर्दीतही रायगड जिल्ह्याचा बहुतांशी भूप्रदेश हा मराठ्यांच्याच वर्चस्वाखाली होता. रायगड जिल्ह्याच्या बाजूला असलेल्या जंजि-याच्या सिद्दीला नमविण्यासाठी त्यांनी जंजि-यावर जोरदार मोहीम उघडली होती. तसेच पोर्तुगीजांना नमविण्यासाठी त्यांनी चैल-रेवदंड्यालाही वेढा घातला होता. त्याचवेळी दिल्लीचा मुघल बादशहा औरंगजेब सर्व सामर्थ्यानिशी दक्षिणेकडे उतरल्याने ही मोहीम त्यांना अर्धवट सोडावी लागली व चैलचा वेढाही उठवावा लागला होता. (डिसेंबर 1683) 1689 मध्ये मुघल-मराठा संघर्शात संभाजी राजे औरंगजेबाच्या हाती सापडल्याने रायगड किल्ल्यासह जिल्ह्याचा बहुतांशी भाग तसेच किनारपट्टीवरील प्रमुख बंदरांचा ताबा शत्रूच्या अर्थातच मुघलांच्या वर्चस्वाखाली आला.   

आंग्रे कालीन रायगड:-

अलिबाग जवळील कुलाबा या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे यांनी आपले प्रमुख केंद्र प्रस्थापित करून जंजिरा किल्ला वगळता रत्नागिरी ते त्रावणकोर पर्यंतच्या किनारपट्टीवर आपले सागरी वर्चस्व प्रस्थापित केले. हर्णे जि. रत्नागिरी येथे जन्मलेल्या व सुवर्णदुर्ग किल्ल्यात बालपण गेलेल्या कान्होजींचे वडील तुकोजी आंग्रे शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार म्हणून नोकरीस होते. त्यामुळे कान्होजींच्या अंगात पराक्रम, साहस, धैर्य हे गुण उपजतच होते.

खांदेरी व उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची त्यांनी नाकेबंदी केली आणि या भागातून येणा-या-जाणा-या व्यापारी जहाजांकडून करवसुली सुरू केली. 17 व्या शतकाच्या अखेरीस त्यांनी कुलाबा किल्ल्याजवळ अलिबाग हे गाव वसविले. ‘अलिबागी’ या नावाची चांदीची नाणी ही त्यांनी चलनात आणली. कान्होजींच्या सागरी सामर्थ्याला घाबरून जंजि-याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज व मुघल या तिघांनी एकत्र येऊन आघाडी उघडली होती. मात्र कान्होजींनी या त्रिकुटाला नामोहरम करून शरण येण्यास भाग पाडले होते. मुंबईतील इंग्रज दफ्तरात केलेल्या नोंदींमधून कान्होजींच्या अनेक यशस्वी मोहिमांची माहिती मिळते.

छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजींची कामगिरी पाहून त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख केले व ‘सरखेल’ ही मानाची पदवी दिली. छत्रपती शाहू आणि ताराबाई यांच्या संघर्शात कान्होजींनी शेवटी शाहूंची बाजू घेतली. कान्होजींच्या ताब्यात असलेल्या बहुतांशी मुलुखावर त्यांची सत्ता शाहूंनी मान्य केली. श्रीवर्धन आणि परिसरातील जंजि-याच्या सिद्दीच्या ताब्यातील गावे वगळून इतर गावेही कान्होजींच्या ताब्यात दिली. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील पश्चीम किनारपट्टीवरील बहुतांशी बंदरे, किल्ले व महसुली गावे यावर कान्होजी आंग्रे यांचेच निर्विवाद वर्चस्व होते.

कान्होजी आंग्रे यांच्या वाढत्या प्रभावामुळे कोकणातून पोर्तुगीज व मुघल सत्तेचे उच्चाटन होण्यास सुरूवात झाली. मुंबईतील इंग्रजांनी मात्र कान्होजीचा प्रभाव रोखण्यासाठी पोर्तुगीजांचे सहकार्य घेऊन 1721 मध्ये संयुक्त मोहीम उघडली होती. यावेळी पेशव्यांच्या मदतीने कान्होजीने इंग्रज व पोर्तुगीजांना जेरीस आणले. या संघर्शात ध्येय साध्य न झाल्याने इंग्रज व पोर्तुगीज यांची मैत्री संपुष्टात येऊन त्यंच्यात शत्रुत्व निर्माण झाले.

1729 मध्ये कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्श सुरू झाला. सेखोजी व संभाजी या दोन औरस पुत्रांनी सत्तेची वाटणी केली. मोठा मुलगा सेखोजी याने कुलाबा किल्ल्यावर तर धाकटा मुलगा संभाजी याने रत्नागिरी जवळील विजयदुर्ग किल्ल्यावर आपली सत्ता प्रस्थापित केली. सेखोजीने 1731 मध्ये चैलच्या राजकोट किल्ल्यावरील मुघलांची सत्ता नेस्तनाबूत केली याचवेळी पेशव्यांनी जंजि-यावर केलेल्या आक्रमणावेळी सेखोजी आंग्रे पेशव्यांच्या मदतीसाठी आले. मात्र ही मोहीम पूर्णपणे अयशस्वी झाली. जंजि-याच्या सिध्दीने आपला प्रदेश  सुरक्षित ठेवलाच, परंतु छत्रपती शाहूंच्या अखत्यारीत असलेल्या मुलुखावर हल्ला करून या प्रदेशाचे अतोनात नुकसान केले. यावेळी रायगड किल्ला सिद्दीने आपल्या ताब्यात घेतला व तळेगड, घोसाळगड, निजामपूर, बिरवाडी, रोहा, माणगाव, दंडराजपुरी इ. भाग पेशव्यांच्या ताब्यात दिला.

मराठ्यांसोबत झालेल्या वारंवारच्या संघर्शात जंजि-याच्या सिद्दीचे सामर्थ खूपच कमकुवत झाले. त्यामुळे त्याचे आरमारही मराठ्यांच्या आरमारापुढे टिकाव धरण्या इतपत राहिले नाही. सिद्दीच्या ताब्यात असलेला मराठी सत्तेचा मानबिंदू रायगड हा आपल्या ताब्यात घेण्याची तीव्र इच्छा छत्रपती शाहू यांची होती. तर आपले जन्मस्थान असलेला मुरुडचा परिसर आपल्या ताब्यात असावा असे पेशव्यांना वाटत होते. म्हणून  पेशव्यांनी पुन्हा जंजि-यावर हल्ला चढविला. याचवेळी औंधच्या पंतप्रतिनिधींनी जोराचा हल्ला चढवून रायगड किल्ला सिद्दीच्या वर्चस्वाखालून मुक्त केला आणि मराठ्यांच्या यशामध्ये मानाचा तुरा खोवला. 

1733 मध्ये सेखोजीचा मृत्यू झाल्याने त्याच्या वारसदारांमध्ये गृहकलह सुरू झाला. या कलहामुळे 1733 ते 1736 असा दीर्घ संघर्श करूनही जंजि-याच्या मोहिमेत फारसे यश पदरात पडले नाही. मराठ्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे पोर्तुगीजांना चैल येथे सैन्यव्यवस्था सतर्क ठेवावी लागत असे. 1739 मध्ये वसई किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर पोर्तुगीजांनी चैल-रेवदंडा-कोर्लई हा भाग इंग्रजांना देऊन टाकला. यावेळी इंग्रज व पोर्तुगीजांचे फारसे सख्य नसले तरी पोर्तुगीजांना पैशाची फार निकड होती. वसईच्या विजयामुळे इंग्रजांना मराठ्या विषयी धडकी भरली. त्यांनी बाळाजी बाजीरावा- बरोबर सप्टेबर 1740 मध्ये तह करून चैल-रेवदंडा मराठ्यांना देऊन टाकले.

दरम्यान इंग्रजांचे अरबी समुद्रातील वर्चस्व वाढण्यास सुरूवात झाली होती. सेखोजीचे वारसदार मानाजी व येसाजी यांच्या संघषात इंग्रजांनी मानाजीला सहकार्य केले. 1740 मध्ये सेखोजीचा दुसरा मुलगा संभाजी याने तुळाजी आंग्रे याची मदत घेऊन कुलाब्यावर आक्रमण केले आणि अलिबाग, थळ, सागरगड हा प्रदेश जिंकून घेतला. त्यामुळे मानाजीने पेशवे व इंग्रज यांची मदत घेऊन पुन्हा तुळाजीवर हल्ला केला व त्यास कैद केले तर संभाजी यास सुवर्णदुर्गाकडे पिटाळून लावले. पेशवे कुलाबा हस्तगत करताहेत असे मानाजीला कळल्याने मानाजी व पेशवे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळे पेशव्यांनी सिद्दीसोबत मैत्री वाढविली. रामजी महादेव बिवलकर याने पेशवे व मानाजी यांच्यात समेट घडवून आणला. सिद्दीने ज्यावेळी कुलाब्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पेशव्यांनी मानाजीला सहकार्य केले. त्यामुळे  थळ-नागाव यांच्या दरम्यान सिद्दीचा पूर्ण पराभव करण्यात मानाजी यशस्वी झाला. तुळाजी हा त्याच्या मृत्यूपर्यंत पेशव्यांच्या कैदेत राहिला.
1758 मध्ये मानाजी आंगे्र याचा मृत्यू झाल्यानंतर रघुजी आंग्रे हा त्याचा मुलगा कुलाब्याचा उत्तराधिकारी बनला. त्याने जंजि-याच्या सिद्दीच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी पेशव्यांची मदत घेतली. खांदेरी व उंदेरी ही बेटे सिद्दीच्या ताब्यातून हिसकावून घेतली. खांदेरी किल्ला त्याने पेशव्यांना बहाल केला व उंदेरीचे नाव जयगड असे ठेवले. जानेवारी 1759 मध्ये मुरुड जवळील पदृम (कासा) हा किल्लाही जिंकून घेतला. त्यानंतर जंजि-यावर मोहीम काढली. मात्र ही मोहीम अयशस्वी झाली.

रघुजी आंग्रे याने आपल्या ताब्यात असलेल्या मुलखात शेती व व्यापाराला उत्तेजन देऊन हा प्रदेश सधन करण्याचा प्रयत्न केला होता. 1793 मध्ये रघुजीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अल्पवयीन असलेल्या मानाजी व कान्होजी यांच्यासह रघुजीची पत्नी आनंदीबाई कुलाब्याचा कारभार पाहू लागली. रघुजीचा अनौरस मुलगा जयसिंग हा देखील त्यांच्या समवेत होता. पुढील काळात कुलाब्यावर कधी आनंदीबाईचे तर कधी जयसिंगाचे वर्चस्व राहिले. या संघर्षात दौलतराव शिंदे यांचा सरदार बाबुराव आंग्रे जो जयसिंगाच्या घराण्यातील होता. त्याने जयसिंगाला मदत करण्याच्या बहाण्याने विश्वासघात करून कुलाब्यावर वर्चस्व मिळविले. पेशव्यांनी त्याला कुलाब्याचा शासक म्हणून मान्यता दिली. 1813 पर्यंत तो कुलाब्याचा अधिपती होता. त्यानंतर मानाजी आंग्रे हा रघुजीचा मुलगा कुलाब्याचा प्रमुख बनला. पेशव्यांनी त्यालाही मान्यता दिली. मात्र कुलाब्याची विस्कटलेली घडी स्थिरस्थावर होईपर्यंत 1817 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मानाजीचा चैदा वर्षाचा मुलगा रघुजी याच्या हाती कुलाब्याचा कारभार आला. याच दरम्यान इंग्रज आणि पेशवे यांच्यात सुरू असलेल्या संघषात 5 नोव्हेंबर 1817 रोजी तिसरे मराठा-इंग्रज युध्द होऊन त्यात पेशव्यांचा पराभव झाला. बाळाजी पंत नातू इंग्रजांना सामील झाला आणि 17 नोव्हेंबर 1817 रोजी इंग्रजांनी पेशवाईचा षेवट केला. पुढे 1 जानेवारी 1818 रोजी पेशव्यांचा सेनापती बापू गोखले आणि इंग्रज यांच्यात भीमा-कोरेगाव येथे निकराची लढाई झाली त्यात बापू गोखलेंना निसटता विजय मिळाला. 19 फेब्रुवारी 1818 रोजी पंढरपूर जवळ झालेल्या अखेरच्या लढाईत इंग्रज सैन्याच्या तुकडीचा प्रमुख जनरल स्मिथ याच्याकडून बापू गोखले मारला गेला आणि ख-या अर्थाने पेशवाईचा शेवट झाला. 

क)  आधुनिक कालखंड -

रायगडाचा पाडाव व जिल्ह्यात ब्रिटिशाचा शिरकाव:-

मराठी सत्तेबरोबर झालेल्या दीर्घकालीन संघर्शात अखेर इंग्रजांनी बाजी मारली आणि मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. 1 जानेवारी 1818 रोजी पेशवा दुस-या बाजीरावाची सेना पराभूत झाली. त्यानंतर पेशव्यांचा सेनापती बापू गोखले आणि इंग्रज सेनाधिकारी जॉन माल्कम यांच्यात पंढरपूर जवळ आष्टी येथे घनघोर लढाई झाली. या लढाईत बापू गोखले मारला गेला. आता पेशवा बाजीरावाला कोणाचाही आधार उरला नाही. तो उत्तरेकडे पळत असताना नर्मदेच्या परिसरात त्याला इंग्रज सैन्याने घेरले. शेवटी बाजीराव स्वतः 3 जून 1818 रोजी माल्कमच्या स्वाधीन झाला. इंग्रजांनी त्याला उत्तरेकडे कानपूर जवळ ब्रम्हावर्त (बिठूर) येथे स्थानबध्द केले. पुणे ही पेशव्यांची राजधानी ब्रिटिषांच्या ताब्यात गेली. शनिवारवाड्यावर ब्रिटिशाचा युनियन जॅक फडकू लागला. मात्र मराठी सत्तेचा मानबिंदू असलेला रायगड अजूनही मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यामुळे मराठी सत्तेचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करण्याच्या हेतूने ब्रिटिशांनी रायगडाकडे कूच केले. कर्नल पॉथर  याच्या नेतृत्वाखाली मोहीम उघडण्यात आली.

1 मे 1818 रोजी पॉथरने  रायगडावर हल्ला चढविला. यावेळी किल्ल्याच्या रक्षणाची  जबाबदारी किल्लेदार शेख अबुद फतेखान याच्याकडे होती. आपली सारी शक्ती पणाला लावून फतेखान इंग्रजांस मुकाबला करीत होता. किल्ल्यावरील भगव्या झेंड्याचं रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता. त्याच्या सोबतीला असणारे मराठी सैनिक प्राणपणाने झुंज देत होते. यावेळी पेशवा दुस-या बाजीरावाच्या पत्नी वाराणसीबाई रायगड किल्ल्यावर होत्या. दहा दिवस इंग्रज आणि मराठे यांच्यात तुंबळ लढाई सुरू होती. रायगडाला वेढा पडल्याची बातमी कांगोरीगडावर व प्रतापगडावर पोहोचली. यावेळी रायगडाच्या रक्षणासाठी पोलादपूर येथून सैन्याची एक तुकडी रवाना झाली. त्यात मालुसरे, गोळे, दरेकर, बांदल यांचा समावेश होता. कर्नल पॉथर पोटल्याच्या डोंगराकडून आपला मोर्चा लागू करणार होता. त्याच्या पिछाडीकडून मराठी सैन्याने हल्ला करण्यासाठी आघाडी उघडली. मात्र इंग्रज सेनाधिकारी जनरल  क्रॉसवी  याने या तुकडीला अडविले. सावित्री व काळ नदीच्या संगमावर त्यांच्यात घनघोर लढाई झाली. या तुकडीचा का्रॅसवी याने पराभव केला.

अखेर 10 मे 1818 रोजी कर्नल प्रॉथर ने दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट घडवून आणला. या स्फोटाने रायगड हादरला. मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यात अंगाची लाही लाही होत असताना गडाखालून तोफांचा आणि बंदुकांचा भडिमार सुरू होता. त्यात रायगड किल्ला पूर्णपणे होरपळून गेला. मराठ्यांनी हार पत्करली आणि रायगड इंग्रजांच्या स्वाधीन झाला. कर्नल प्रॉथर गडावर आला. त्याच्या हल्ल्याने रायगडाची अवस्था अत्यंत भयावह झाली होती. गडावरील सर्व साधनसामग्री जळून बेचिराख झाली होती. पेशवा बाजीरावाच्या पत्नी वाराणसीबाई एका खुरट्या झुडपाच्या आडोशाला खिन्नपणे उभ्या होत्या. कर्नल प्रॉथर त्यांच्याजवळ आला. तो त्यांच्याशी अतिशय आदराने वागला. पुढे प्रॉथर त्यांना अत्यंत सन्मानाने मेण्यात बसवून पुण्याकडे रवाना केले. त्यानंतर त्यांची रवानगी बिठूर येथे स्थानबध्द असलेल्या बाजीरावाकडे केली. 10 मे रोजी इंग्रजांनी रायगडाचा ताबा आपल्याकडे घेतला. ज्या रायगडाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी बनविले, ज्या रायगडाने शिवकाळात वैभवाचे सारे साज आपल्या अंगाखांद्यावर खेळविले, त्या रायगडाची इंग्रजांनी पूर्णपणे धुळधाण केली. रायगड ताब्यात आल्याने आजुबाजूच्या परिसरावर इंग्रजांचे नियंत्रण प्रस्थापित झाले.

कुलाबा संस्थानाचा शेवट -

मराठ्यांच्या इतिहासात नावलौकीक प्राप्त झालेले कुलाबा (अलिबाग) येथील आंग्रे हे एक महत्वाचे घराणे होते. कान्होजी आंग्रे हे या घराण्यातील कर्तबगार पुरूष व या घराण्याचे संस्थापक होते. त्यांचे वडील तुकोजी आंग्रे हे शिवाजी महाराजांच्या पदरी होते. छत्रपती राजाराम यांच्या कारकीर्दीत आंग्रे घराणे प्रसिध्दीच्या झोतात आले. कुलाबा हा अलिबाग जवळील किल्ला आंग्रे घराण्याचे मुख्य ठाणे असून पश्चिम किनारपट्टीवर त्यांची हुकुमत चालत असे. त्यांचा पराक्रम व कर्तबगारी पाहून राजाराम महाराजांनी त्यांना मराठी आरमाराचे प्रमुख नेमून ‘सरखेल’ ही मानाची पदवी दिली होती. कान्होजींनी मराठ्यांचे आरमार कार्यक्षम  बनवून पश्चिम किनारपट्टीवर इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, सिद्दी या सत्तांवर वचक निर्माण केला. कान्होजींच्या मृत्यूनंतर या घराण्यात होऊन गेलेल्या वारसांचा तपशील वर आला आहे.
पेशवा दुसरा  बाजीराव याच्या कारकीर्दीत 1817 मध्ये मानाजी आंग्रे दुसरा याच्या मृत्यूनंतर रघुजी आंग्रे दुसरा हा सरखेल पदावर आला. हा कालखंड म्हणजे मराठी सत्तेची (पेशवाईची) अखेर होती. दुस-याच वर्षी ब्रिटिशांनी मराठी सत्तेचा शेवट केला. रघुजी आंग्रे यांनी मात्र कुलाबा संस्थानाचा कारभार सुरळितपणे सुरू ठेवला. संस्थानात शंतता व सुव्यवस्था निर्माण केली. परंतु इंग्रजांचा संस्थानी कारभारातील हस्तक्षेप वाढत जाऊन 1822 मध्ये रघुजी आंग्रे व इंग्रज यांच्यात तह घडून आला. या तहामुळे रघुजी आंग्रे व पर्यायाने कुलाबा संस्थानावर अनेक बंधने लादण्यात आली.

रघुजी आंग्रे यांचा 26 डिसेंबर 1838 मध्ये मृत्यू झाला. त्याला असलेल्या दोन मुलांपैकी एक मुलगा रघुजीच्या मृत्यू अगोदरच मरण पावला होता तर दुसरा मुलगा त्याच्या मृत्यूनंतर जन्माला आला. या अल्पवयीन मुलास कान्होजी दुसरा या नावाने 1839 मध्ये सरखेलपदी विराजमान करण्यात आले. 6 फेब्रुवारी 1839 रोजी इंग्रजांनी त्यास मान्यता दिली. मात्र 21 मार्च 1839 रोजी त्याचा मृत्यू झाला.
कान्होजी दुसरा हा अल्पवयातच वारल्याने आंग्य्रांच्या गादीला वारसच उरला नाही. त्यामुळे ब्रिटिश सरकारने कुलाबा हे संस्थानच बरखास्त केले. रघुजीच्या पत्नीने गादीला वारस म्हणून दत्तक घेण्याचा प्रयत्न चालविला. मात्र कान्होजी दुसरा याचा वारस नसल्याने 30 डिसेंबर 1843 रोजी कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने पाठविलेल्या खलित्यानुसार सरकारने कुलाबा संस्थान पूर्णपणे खालसा केले. इंग्रज अधिकारी जे. एम. डेव्हिस याने कुलाबा संस्थानाचा दिवाण विनायक परशुराम याच्याकडून सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली. त्याची कुलाब्याचा पोलिटिकल सुपरिटेन्डेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि कुलाबा हे संस्थान ब्रिटिश साम्राज्यात विलीन होऊन त्यावर ब्रिटिश नियंत्रण प्रस्थापित झाले.