अलिबाग समुद्रकिनारा (Alibag Beach)

Alibag Beach

हा मुख्य समुद्रकिनारा आहे. सपाट आणि लांबी हे या समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ठ. अलिबाग एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्दीस आल्यापासून अलिबाग बीचवर नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. जरी वर्दळ असली तरी आवाजाचे प्रदूषण नाही. म्हणूनच ही बीच म्हणजे अलिबागचे एक वैशिष्टय आहे. समुद्रकिनारा वाळू थोडी काळसर आणि पांढरी आहे. समुद्रकिनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर कुलाबा नावाचा किल्ला दिमाखात उभा आहे. या किल्यावर जाण्यासाठी फेरी सेवा देखील उपलब्ध आहे तसेच जर, ओहोटी वेळ असेल तर आपण पायी सुद्धा जावू शकतो. समुद्रकिनाऱ्यावरील सर्व मजेदार वॉटर  स्पोर्ट पण अनुभवू शकता. संपूर्ण किल्ल्याचे अवलोकन करीत मऊशार वाळूतून चालत असता किनार्‍यावरील सुरूची उंचच उंच झाडे त्यांना साथ देणारी नारळाच्या झाडांची शोभा आपले मन खचितच मोहून टाकेल यात शंका नाही. किनार्‍यावरील खाजगी व सरकारी बंगल्यामुळे हा किनारा अधिकच खुलून दिसतो. शिवाय किनार्‍यावर शहाळयाचे पाणी आईस्क्रम भेळपूरी पॅटीस इ. खादयपदार्थ विक्रेते क्षुधाशांतीसाठी आहेतच. सागरलाटांच्या खळाळत्या नादसौदर्याचा अनुभव येथेच घ्यावा. जसजसा सूर्य अस्तास लावू लागेल तेव्हा जरा क्षितीजाकडे नजर टाका व आकाशाच्या रंगपटावर उधळणार्‍या सप्तरंगाची आतिषबाजी पहा. अशावेळी अंधुक प्रकाशात समोरील किल्ल्याचा गगनभेदी दरारा आपणांस हळूच इतिहासात ओढू लागेल. अलिबाग एस.टी. स्थानकापासून सुमारे एक कि.मी. अंतरावर पश्चमेस साधारण ४-५ किमी. लांबीचा हा किनारा आहे. वाटेत सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिस, जिल्हा रूग्णालय, शासकीय विश्रामगृह, जिल्हा परिषद पत्रकार भवन ही अलिबागमधील महत्वाची ठिकाणे येतील. उजव्या हाताला क्रिडाभुवनचे प्रशस्त मैदान लागेल. किनार्‍यावर पोहोचल्यावर ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याचे दर्शन होईल.

Add new comment