कान्होजी आंग्रे (Kanhoji Angre)

kanhoji

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्मिताना आरमाराची मुहुर्तमेढ रोवली तर मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने यावर कळस रचला गेला. कान्होजी आंग्रेंनी इंग्रज व पोर्तुगिजांची अनेक आक्रमणे परतवून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या मराठी स्वराज्याचे रक्षण केले.

छत्रपतींच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्या पासून कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची प्रथम सुरुवात झाली. महाराणी ताराबाई यांनी कान्होजी आंग्रे यांना 'ध्वजवृंदाधिकारी' ही पदवी बहाल केली. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कान्होजी आंग्रे यांचे महत्व ओळखून त्यांना छत्रपती शाहू यांच्याकडे वळविले होते. सन १६९४ पासून कोकणात कान्होजी आंग्रे पराक्रमाने गर्जत होते. राजाराम महाराजांच्यापासूनच कान्होजी उत्तम कार्य बजावत होते. कोकणची भूमि मोघलांच्या जुलूमापासून सुरक्षित राखण्यात कान्होजींनी यश संपादन केले होते. सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांची सत्ता प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर होती पण कान्होजी आंग्रे यांच्यापुढे त्यांचे काहीही चालले नाही. आंग्रे यांच्या ताब्यात पुष्कळ प्रदेश व कित्येक किल्ले आले. त्यामुळे दर्यावर त्यांची भिती सगळ्यांनाच उत्पन्न झाली होती. शंभुराजे यांच्या बलिदानानंतर छत्रपती राजारामांना कान्होजी आंग्रे यांचे चांगले सहाय्य झाले. छत्रपती राजाराम सन १७०० मध्ये सिंहगडावर मृत्यू पावले. पण तत्पूर्वीच कान्होजींनी १६९७ मध्ये “कुलाबा” हे आपले मुख्य ठाणे केले होते. त्यांनी राज्यात जमाबंदीला आरंभ केला होता. 

पुढील काळात छत्रपती शाहू महाराज आणि कान्होजी यांच्यामध्ये तह झाला. या तहाने १0 जंजिरे व १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांना मिळाले होते. छत्रपतीनी त्यांना 'सरखेल' ही पदवी बहाल केली. आंग्रे यांची सत्ता कोकण किनाऱ्यावरील मांडवे ते त्रावणकोरपर्यंत पसरली. कान्होजींचे पश्चिम कोकण किनाऱ्यावरील वाढते यश पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि विशेषत: इंग्रज यांना नकोसे वाटू लागले होते. त्यांनी संयुक्तरित्या कान्होजीबरोबर आरमारी लढाया केल्या परंतु कान्होजी यांच्यापुढे त्यांना अपयशच स्विकारावे लागले होते.

कान्होजींची लष्करी व आरमारी सैन्याची शिस्त कौतुकास्पद होती. कान्होजींचे आरमार प्रबल होते. त्यांच्या आरमारामध्ये १५० पासून २०० टन वजनाची, ६ व ९ तोफांची लढाऊ जहाजे व गलबते होती. या प्रबळ आरमारावर निष्णात स्वामीनिष्ठ व संतोषी असे दर्यावर्दी लोकही होते. आंग्रे यांचे दर्यावर आधिपत्य होते.

कान्होजी आंग्रे यांचा जन्मकाल उपलब्ध नाही. परंतु त्यांचा जन्म सन १६६९ च्या सुमारास झाला असावा. ते परिवारासह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे यात्रेस गेल्याचा उल्लेख मिळतो. कान्होजी यांचे लौकिक शिक्षण  हरणाई येथील जोशी-ब्राम्हण यांच्याकडे झाले होते. कान्होजींचा बांधा सुदृढ होता. पण ते अंगाने स्थूल होते. त्यांची मुद्रा भव्य होती. डोळे पाणीदार होते. ते आपल्याजवळील सरदारासमवेत अतिशय प्रेमाने वागत असत. त्यांच्या वागण्यात प्रेम वात्सल्य होते. पण त्यांची शिक्षा कडक असे. सन १६९८ मध्ये त्यांनी तळ कोकणचा बंदोबस्त उत्तमरितीने केला होता.

कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू मिती आषाढ वद्य ५ शके 1६५१ दिनांक ४ जुलै १७२९ रोजी झाला. कान्होजी आंग्रे हे मनाने निर्मळ होते. स्वधर्मावर त्यांची जाज्वल्य निष्ठा होती. त्यांच्या सैन्यात यवन सरदारही होते. त्यांचे न्याय फैसले अत्यंत नि:पक्षपाती होते. त्यांनी एकूण ३६ वर्ष राज्य कारभार केला. ६० वर्ष त्यांना आयुष्य लाभले. उत्पन्न वाढवून त्यांनी राज्याला फायदा करुन दिला. प्रेम, वात्सल्य व ममता देऊन जनतेला सांभाळले. अलिबाग (श्रीबाग) येथे मध्यवर्ती स्थानी त्यांची समाधी आहे. श्री क्षेत्र आळंदी येथे कान्होजी आंग्रे यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी दीपमाळ बांधल्याचा शिलालेखात उल्लेख सापडतो.  महान पराक्रमी सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शेवटच्या स्मृती जतन करणारी वास्तु म्हणजे छत्रीबाग. रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने बोटीने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल-पेण-अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे. अलिबागला पनवेलहून पेणपर्यंत रेल्वेनेही जाता येते. अलिबाग शहरात पोहोचलो की अलिबाग एस..टी.स्थानकापासून ५ मिनिटांच्या अंतरावर बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठीकरूळ नाका येथील छत्रीबागेत सरखेल कान्होजी आंग्रे यांची समाधी आहे. 

 

Add new comment