व्हिजन रायगड!

ओळख रायगडाची

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पसरलेला, नैसर्गीक साधनसंपत्तीने समृद्ध असा रायगड जिल्हा कोकणाचा एक प्रमुख भाग आहे. रायगड जिल्हयाला शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून मान प्राप्त झाला आहे. शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणांनी हया भूमीला स्पर्श केलेला आहे. हया अतुलनीय जिल्हयात अजिंक्य असा मुरुड जंजिरा किल्ला स्थित आहे.

“दक्षिण काशी“ म्हणून संबोधले जाणारे हरिहरेश्वर हे ठिकाण रायगडात स्थित आहे. सी. डी. देशमुख, स्वर्गवासी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले आणि श्री. परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांसारख्या थोर पुरुषांनी रायगडात जन्म घेतला आहे. आचार्य विनोबा भावे यांचा जन्म गागोदे गावात झाला आहे. या प्रकारे रायगडाला सामाजिक पाश्र्वभूमी देखील लाभली आहे.

औद्योगिक क्षेत्रातही रायगड प्रगती पथावर असून खोपोलीचे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र व थळ-वायशेतचा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स चा कारखाना यांची दखल प्रामुख्याने घ्यावीच लागते. शिवाय पनवेल व महाड येथील औद्योगिक वसाहत, पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांमुळे येथील अर्थकारणाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

रायगड जिल्ह्यातून मासे आणि कोळंबी भरपूर प्रमाणात परराज्यांत जातात. तसेच पेण आणि इतर ठिकाणी बनणाऱ्या गणपतीच्या मूर्ती केवळ परराज्यात नव्हे तर परदेशांत देखील मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. कोकण रेल्वेमुळे रायगडच्या आर्थिक प्रगतीला अधिक वेग आला. नव्या पिढीचा कल सामूहिक शेतीकडे असल्याने कृषी क्षेत्रातील आधुनिक प्रकारचे प्रयोग जिल्ह्यात केले जात आहेत. मात्र पर्यटन हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग आहे.

रायगडाची समग्र माहिती..  ऐतिहासिक पार्श्वभूमी (अभ्यासपूर्ण लेख)